हे असे पहिल्यांदाच उलटे घडतेय की, मुंबई महापालिका ‘एमएमआरडीए’ला पैसे देतेय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या ठेवींवर मिंधे सरकार राजरोसपणे दरोडा टाकत असून या ठेवींमधून ‘एमएमआरडीए’ला ‘मेट्रो’साठी तब्बल एक हजार कोटींचे ‘गिफ्ट’ देण्यात आले आहे. याच मुद्दय़ावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर घणाघात केला आहे. मुंबई महापालिका ‘एमएमआरडीए’ला पैसे देतेय, हे असे पहिल्यांदाच उलटं होत आहे, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.

शिवसेनेची मुंबई महापालिकेत सत्ता असताना महापालिकेच्या मुदत ठेवी वाढून 92 हजार कोटींवर पोहोचल्या होत्या, मात्र माजी पालिका आयुक्त-प्रशासक इकबालसिंह चहल यांच्या कार्यकाळात मुदत ठेवींची लूट सुरू झाली. त्यामुळे मुदत ठेवी घटून 84 हजार कोटींपर्यंत पोहोचल्या आहेत. यावरून आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार आणि माजी पालिका आयुक्त आणि प्रशासक इकबालसिंह चहल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, मुंबई महापालिका आणि राज्यात सत्तेत असताना आम्ही बेस्ट कर्मचाऱयांना पीएफ, ग्रॅच्युईटी सर्व करून द्यायचो. मी स्वतः या बैठकीत बसून राज्य सरकारकडून महापालिकेला पैसे आणून दिले आहेत, मात्र हे पहिल्यांदाच असे उलटे होत आहे की, मुंबई महापालिका ‘एमएमआरडीए’ला पैसे देतेय.

इकबालसिंह चहल हे ‘विकली रिचार्जर’

मुंबई महापालिकेत गेल्या अडीच वर्षांपासून एकही नगरसेवक नाही, महापौर नाही आणि वैधानिक समितीही अस्तित्वात नाही. प्रशासक म्हणून काम करताना इकबालसिंह चहल यांनी हवे तसे पैसे खाल्ले आणि वरतीही पोहोचवले. नुकतीच त्यांची निवडणूक आयोगाने हकालपट्टी केली नसती तर या पदावर अजूनही ते राहिले असते. कारण ते ‘विकली रिचार्जर’ होते.