
तिसऱ्या टप्प्यासाठी आजपासून अर्ज भरण्यास प्रारंभ, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, सोलापूर, माढा आणि बारामती लोकसभा मतदारसंघांसाठी 7 मे रोजी मतदान
देशात एकूण सात टप्प्यांत जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यांत पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, सोलापूर, माढा आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उद्यापासून (दि. 12) उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे. लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत. या मतदारसंघांसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे स्वीकारणार आहेत. तर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे स्वीकारणार आहेत.
दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याच्या पार्श्वभूमीवर 12 ते 22 एप्रिल या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या वतीने श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे 16 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार व विद्यमान खासदार संजय मंडलिक हे महायुतीकडून 15 एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना शंभर मीटर परिसरात उमेदवारांना सोबत पाच व्यक्तींना तसेच तीन वाहनांना घेऊन येण्याची परवानगी देण्यात आली आहे. उमेदवारी अर्जामध्ये जन्म, शिक्षण, राहण्याचे ठिकाण या व्यक्तिगत माहितीसह कौटुंबिक व संपत्तीची माहिती द्यावयाची आहे. तसेच काही गुन्हे दाखल असतील तर त्याचीही माहिती द्यावयाची आहे.
राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण करून घेण्याचे निर्देश
मुद्रित माध्यमांमध्ये मतदानाच्या दिवशी व एक दिवस आधी तर इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी सर्व जाहिरातींसाठी पूर्व प्रमाणिकरण करावे लागणार आहे. याबाबत निर्देश राजकीय पक्ष व उमेदवारांना दिले आहेत. मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवस पूर्वी मुद्रित माध्यमांमधून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱया वा द्वेषपूर्ण जाहिरातीमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसेल, अशा जाहिराती प्रकाशित होऊ नये याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. मतदानादिवशी व मतदानाच्या एक दिवस अगोदर प्रिंट माध्यमाद्वारे प्रकाशित केलेल्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणिकरण न झाल्याचे आढळल्यास तक्रार दाखल करण्यात येते व त्या जाहिराती पेड न्यूजअंतर्गत नोंदविल्या जातात.
डमी मतपत्रिका, बॅलेट युनिट आयोगाच्या सूचनांप्रमाणे करा
z लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून छापल्या जाणाऱया, तयार करण्यात येणाऱया डमी मतपत्रिका तसेच डमी बॅलेट युनिट आयोगाच्या नियमावलीतील सूचनांप्रमाणे छापण्याचे, तयार करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे. निवडणुकीच्या मतपत्रिकेवर उमेदवाराचे नाव तसेच चिन्ह ज्याजागी दर्शविले जाईल, त्या माहितीच्या आधारे डमी मतपत्रिका छापण्यास हरकत नाही. डमी मतपत्रिकेमध्ये इतर निवडणूक लढविणाऱया उमेदवारांची नावे तसेच चिन्हे यांचा समावेश असता कामा नये. डमी मतपत्रिकेचा आकार व रंग खऱया मतपत्रिकेशी मिळता-जुळता असता कामा नये, अशी तरतूद आहे. डमी बॅलेट युनिट तपकिरी, पिवळा किंवा करडय़ा रंगाने रंगविलेला असावा, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.
उमेदवाराचे स्वतंत्र बँक खाते आवश्यक
z लोकसभा निवडणूक 2024 लढविणाऱया उमेदवारांसाठी एकूण खर्चाची कमाल मर्यादा 95 लाख आहे. उमेदवाराने अर्ज दाखल करण्यापूर्वी किमान एक दिवस अगोदर केवळ निवडणूक खर्चाच्या प्रयोजनासाठी राष्ट्रीयीकृत, सहकारी बँक वा पोस्ट कार्यालयात स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक आहे. विद्यमान कोणतेही खाते वापरण्यात येऊ नये. हे खाते उमेदवाराच्या वैयक्तिक नावाने वा उमेदवार आणि त्याचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त नावे उघडता येईल. हे खाते फक्त लोकसभा निवडणूक 2024 च्या जमा-खर्चासाठीच वापरता येणार असून, त्यामध्ये इतर कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. उमेदवारास स्वतःच्या निधीसह इतर स्रोतातून प्राप्त होणारा सर्व निधी स्वतंत्र बँक खात्यात जमा करणे व सर्व खर्चाचे व्यवहार करणे बंधनकारक आहे. उमेदवारास संपूर्ण निवडणूक कालावधीत एक व्यक्ती वा संस्थेकडून दहा हजार रुपये रक्कम देणगी अथवा रोख स्वरूपात स्वीकारता येईल. तसेच उमेदवाराने बहुतांश सर्व व्यवहार धनादेश, एनईएफटी, आरटीजीएस वा ऑनलाइन पद्धतीने करणे अपेक्षित आहे.
निवडणुकीनंतर खर्चाचा तपशील सादर करताना बँक खात्याचे विवरणपत्र सादर करावे लागेल. अर्ज दाखल केल्यानंतर संबंधित उमेदवाराला दैनंदिन खर्च नोंदवही, बँक नोंदवही व रोख नोंदवही समाविष्ट असेल अशी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पृष्ठांकित व प्रमाणित केलेली दैनंदिन खर्च नोंदवही देण्यात येईल. यामध्ये उमेदवार वा प्रतिनिधी यांनी दैनंदिन खर्च नोंदविणे आवश्यक आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत राजकीय पक्ष, उमेदवार यांच्याकडून प्रचारासाठी वापरल्या जाणाऱया वस्तू सेवांचे दर अधिसूचित केले आहेत. त्यानुसार उमेदवार, राजकीय पक्ष यांचा दैनंदिन खर्च नोंदविण्यात येईल. उमेदवारांकडून ठेवण्यात आलेल्या खर्च नोंदवहीची केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नियुक्त खर्च निरीक्षक यांच्यामार्फत प्रचार कालावधीत एकूण तीन वेळा तपासणी होणार असून, या तपासणीसाठी संबंधित उमेदवार, प्रतिनिधीने उपस्थित राहणे बंधनकारक आहे.





























































