
मुंबईतील परळ गावस्थित श्री वाघेश्वरीदेवीचा आज सूक्त शांती होमहवनाचा 67वा वार्षिक जत्रोत्सव आहे. हजारोंच्या संख्येने भक्तगण या देवीच्या दर्शनाला व महाप्रसादाला येतात. होमहवनाचा धार्मिक कार्यक्रम मोठा व वेधक असतो. पुरोहितांकडून शास्त्राsक्त पद्धतीने व विधीपूर्वक तसेच ट्रस्टने त्या त्या वर्षी ठरवलेली यजमान जोडपी तो श्रद्धेने पार पाडतात.
मुंबईतील परळ गाव, गोलंजी हिल परिसरात श्री वाघेश्वरीचे पुरातन मंदिर आहे. काही ठिकाणी या देवीचा अंबाबाई म्हणूनसुद्धा उल्लेख आढळतो. इ. सन 1857मध्ये हे मंदिर उद्योजक बालाजी शामशेट मुरकुटे यांनी बांधले.
टेकडीसदृश उंचीवर हे देवस्थान आहे. पूर्वी पोर्तुगीज व इंग्रज आरमाराचे टेहळणी स्थान होते. 40-50 वर्षांपूर्वी या टेकडीवरून आसपास व लांबवरचा परिसर दृष्टिक्षेपात यायचा, पण आता जवळपासच्या उंच इमारती व टॉवर्समुळे ते शक्य होत नाही. आता मात्र ट्रस्टने कठडय़ासह सिमेंटच्या रुंद पायऱया बांधून भक्तांसाठी सोय केली आहे. हे देवस्थान जागृत आहे असा भक्तांचा दृढ विश्वास आहे. 1958 सालापासून दर चैत्र महिन्यात श्री सूक्त शांती होम सुरू झाला आहे.
हे देवस्थान दैवज्ञांचे आहे व सरकारदरबारी रजिस्टर आहे. दैवज्ञ ब्राह्मण कुलातील शंकरशेट, घुमरे, बंदरकर, पिसाट, मुरकुटे, मोहरे, व्हाळकर, सुरावकर, दीक्षित, वेळणेकर, भरडकर, घोडबंदरकर, साखरेकर आदी कुटुंबीयांचे हे कुलदैवत आहे.
या देवस्थानाचा लौकिक महाराष्ट्रात आहे. त्यामुळे असंख्य भक्तजन पूजेसाठी, हवनात नारळ, प्रसाद आदी आहुती देण्यासाठी तसेच नवसासाठी श्रद्धेने येथे येतात. श्री वाघेश्वरी मंदिर पुरातन आहे. गाभाऱयातील अष्ममूर्ती त्याची साक्ष देतात. काळाच्या ओघात देवळात व जवळपास काही जुजबी बदल झाले आहेत.
मंदिराच्या मुख्य गाभाऱयात श्री वाघेश्वरीची पूर्णाकृती पुरातन मूर्ती आहे. ती पूर्वाभिमुख आहे. गाभाऱयाच्या बाहेर दालनात श्री भगवती देवीची मूर्ती आहे. मंदिराच्या समोरील मोकळ्या जागेत कायमस्वरूपी यज्ञपुंड उपलब्ध आहे.
1982 साली महाराष्ट्र राज्य जॉइंट चॅरिटी कमिशनर यांनी या देवस्थानच्या ट्रस्टसाठी विश्वस्त नेमले. मनोहर पालशेतकर यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त मंडळ नेमले गेले. त्यात अध्यक्ष सुरेंद्रनाथ शंकरशेट, दीनानाथ गुहागरकर, झिलू आकेरकर, सूर्यकांत साने, गोपीनाथ कडणे, संतोष कारेकर, प्रभाकर भुर्पे आदी अनेक मान्यवर सदस्य होते. यांच्याकरवी देवस्थानाचा कारभार सुरू झाला. दरम्यान खूप काही अडचणी आल्या, पण अर्जदार सूर्यकांतजी साने यांनी जिद्दीने व खूप मेहनत घेऊन 10 फेब्रुवारी 1982मध्ये सहा. धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार ट्रस्ट नोंदवला. ‘श्री वाघेश्वरीदेवी टेंपल ट्रस्ट’ रजिस्टर क्रमांक 5- 3405. यासाठी सूर्यकांत साने यांचे योगदान फार महत्त्वाचे होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ताजीराव घोसाळकर यांनीही उत्तम पुढाकार घेतला होता हे आठवते.
वर्षानुवर्षे या देवस्थानचे माहात्म्य व भक्त मंडळींची मांदियाळी वाढतेच आहे. देवस्थानचे सांप्रत व्यवस्थापनही उत्तम कार्य करत आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, अध्यक्ष संजयनाना वेदक यांचे सक्षम कार्य व सहयोग वेधक आहे. विश्वस्त सुरेंद्र शंकरशेट, अॅड. नरेंद्र बांदिवडेकर, देवेंद्र खेडेकर, मोहनराव म्हाप्रळकर, रेखा नागवेकर, नरेश वैद्य, अरुण आडवणकर, सुमन शिरवटकर यांच्यासह सल्लागार, कार्यकारी सदस्य, उत्सव कमिटी, निधी संकलक, स्वयंसेवक यांचे कार्यही निश्चित मोठे आहे. या समस्त मंडळींना धन्यवाद






















































