
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहाटे श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन अनेक कोल्हापूरकर आपल्या नव्या वर्षाची सुरुवात करतात. बुधवारी पहाटेपासूनच मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा राज्यांसह देशभरातील पर्यटक आणि भाविक मोठय़ा संख्येने कोल्हापुरात दाखल झाले. यामुळे कोल्हापुरातील भक्तनिवास, खासगी हॉटेल्स अजूनही ‘हाऊसफुल्ल’ झाले आहेत. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 12नंतर नववर्षाच्या स्वागताला सुरुवात झाली. आतषबाजी तसेच जल्लोषात सरत्या वर्षाला सर्वांनी निरोप दिला. नवीन वर्षाची सुरुवात श्री अंबाबाईच्या दर्शनाने करण्यास भाविक उच्चांकी गर्दी करीत असल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी पोलीस प्रशासनाकडून मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.