
क्रेडिट कार्डच्या नावाखाली सायबर ठगाने राज्य राखीव पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्याची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ठगाने चार लाख रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी वनराई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार हे राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहेत. 21 डिसेंबरला ते रजेवर असल्याने घरी होते तेव्हा त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन केला. त्यांना क्रेडिट कार्डबाबत विचारणा केली. त्यानंतर तक्रारदार याने क्रेडिट कार्डसाठी होकार दिला. काही वेळानंतर त्याने तक्रारदार यांना एका बँकेची लिंक पाठवली. ती लिंक त्याने ओपन केल्यावर एक अॅप डाऊनलोड केले. ते अॅप डाऊनलोड झाल्यावर एक पेज उघडले. त्या पेजवर त्याने माहितीसह ओटीपी नंबर शेअर केला. ओटीपी शेअर करताच त्यांच्या खात्यातून तीन रुपये डेबिट झाले. त्यानंतर इतर काही ऑनलाइन व्यवहार झाले. ठगाने त्यांच्या दोन्ही बँक खात्यांतून एकूण 4 लाख रुपये उकळले. खात्यातून पैसे गेल्याचे समजताच त्यांना धक्काच बसला. त्यांनी वनराई पोलीस ठाण्यात धाव घेतली.