
जे हास्य सिडनी कसोटीत स्मिथच्या चेहऱ्यावर उमटले नव्हते ते अखेर गॉलच्या मैदानावर उमटले. स्टीव्हन स्मिथने आपल्या पहिल्याच चेंडूवर एकेरी धाव काढत ‘दसहजारी मनसबदार’ होण्याचा मान मिळवला. एवढेच नव्हे तर उस्मान ख्वाजासह तिसऱ्या विकेटसाठी 195 धावांची भागी रचत ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात पहिल्या दिवसअखेर 2 बाद 330 अशी दमदार मजल मारून दिली.
ऑस्ट्रेलियाने वर्षाच्या प्रारंभीच हिंदुस्थानविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका 3-1 जिंकत आपले जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीतील स्थान निश्चित केले होते. आज स्मिथने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आणि सलामीला ट्रव्हिस हेडला पाठवले. हेडने आपला वेगवान खेळ दाखवत 40 चेंडूंत 57 धावा ठोकत उस्मान ख्वाजासह 92 धावांची सलामी दिली. मग मार्नस लाबुशन (20) लवकर बाद झाला. पुढे पुढील दोन्ही सत्र ख्वाजा आणि स्मिथने सहज खेळून काढले.
स्मिथचा दुहेरी पराक्रम
स्मिथने आज दहा हजार धावांचा टप्पा गाठत कसोटी क्रिकेटमधील 15 वा फलंदाज होण्याचा मान मिळवला. तसेच तो रिकी पॉण्टिंग (13,378), ऍलन बॉर्डर (11,174), स्टीव्ह वॉ (10,927) यांच्यानंतर चौथा ऑस्ट्रेलियन फलंदाजही ठरला. कसोटी इतिहासात ऑस्ट्रेलियाच्याच सर्वाधिक फलंदाजांनी हा टप्पा गाठला आहे. त्यानंतर हिंदुस्थान (3), इंग्लंड, वेस्ट इंडीज, श्रीलंका (2) आणि दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान (1) या देशांच्या फलंदाजांनी दहा हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याचबरोबर स्मिथने आपले 35 वे कसोटी शतक झळकावत सुनील गावसकर, युनूस खान, ब्रायन लारा आणि महेला जयवर्धने या 34 शतके ठोकणाऱया फलंदाजांनाही मागे टाकले. आता त्याच्यापुढे सचिन (51), कॅलिस (45), पॉण्टिंग (41), संगक्कारा (38), रुट (36) आणि द्रविड (36) हे सहा शतकवीर आहेत.