मुंबई-गोवा महामार्गावरील आरवली पुलाच्या कामाला गती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे मुंबई-गोवा हायवेवर गरम पाण्याच्या कुंडाजवळ असलेला ब्रिटिशकालीन पूल नव्याने बांधण्यात येत आहे. या कामाला गती आली आहे.

गरम पाण्याच्या कुंडाच्या दोन्ही बाजूने स्वतंत्र पूल बांधण्यात येणार आहेत. एका पुलाचे काम पूर्ण झाले आहे, तर दुसऱया पुलाच्या कामाला प्रारंभ झाला आहे. गरम पाण्याचे ,कुंड असल्याने येण्यासाठी व जाण्यासाठी स्वतंत्र पूल आखण्यात आले आहेत. कुंडाच्या बाजूला असलेल्या ब्रिटिशकालीन पुलाच्या जागी मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी हा पूल बांधण्यात येत आहे. या पुलाचे अद्याप बांधकाम पूर्ण न झाल्याने आरवली ते खेरशेतपर्यंत एकाच मार्गावरून येणारी व जाणारी वाहतूक सुरू आहे. या पुलाचे काम पूर्ण झाल्यावर आरवली ते चिपळूणपर्यंत दोन्ही बाजूच्या मार्गांचे काम पूर्ण होईल. गेली अनेक वर्षे रखडलेल्या या रस्त्याचे काम दर्जेदार व युद्धपातळीवर करावे अशी मागणी होत आहे. अपुऱया कामामुळे सर्व्हिस रोडचेही काम अपुरे राहिले आहे. सर्वत्र पसरलेल्या खडीमुळे व धुळीमुळे परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.