ठाणे पालिकेकडे आग विझवण्यासाठीही पैसे नाहीत; डीपीडीसीसमोर झोळी पसरण्याची वेळ

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती अतिशय बिकट झाली आहे. तिजोरीत खडखडाट निर्माण झाला असून आग विझवण्यासाठीदेखील पैसे नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आवश्यक असलेली अत्याधुनिक वाहने खरेदी करण्याची ऐपत प्रशासनाकडे उरली नसल्याने डीपीडीसीसमोर झोळी पसरण्याची वेळ आली आहे. ही वाहने खरेदी करण्याकरिता 35 कोटी देता का..अशी आर्जवे करण्यात आली आहेत. अग्निशमन दल सक्षम होण्यासाठी दुसऱ्या यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत असेल तर महापालिका करते तरी काय, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये लोकवस्ती ही झपाट्याने वाढते आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसायसुद्धा वाढत आहेत. अरुंद लोकवस्ती असलेल्या ठिकाणी आग विझवताना वेगवेगळ्या प्रकारची लहान, मोठी व अत्याधुनिक वाहनांची आवश्यकता आहे. तसेच लोकवस्तीमध्ये फायर इंजिन पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होज पाइप वापरून सदरची आग विझवावी लागत असल्याने अग्निशमन विभागाने जिल्हा वार्षिक योजना निधीतून पालिकेच्या अग्निशमन विभागास 10 वॉटर टेंडर व 1 मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर वाहने खरेदी करण्याबाबत प्रस्ताव सादर केलेला आहे.

सध्याच्या घडीला 68 वाहने

ठाणे शहराच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता पालिका हद्दीत मोठमोठ्या उंच इमारती उभ्या राहत आहेत. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे शहरात असल्याने आगीसारखी किंवा इतर दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाला सेवा पुरवावी लागते. ठाण्यात अग्निशमन विभागाचे 9 अग्निशमन केंद्र असून एका मुख्य अग्निशमन कार्यालयासह 2 नवीन प्रस्तावित अग्निशमन केंद्रे आहेत. अग्निशमन केंद्रामध्ये वाहनांचे 15 प्रकार असून एकूण 68 वाहने सध्याच्या घडीला आहेत.

प्रस्तावात नेमके काय?

अत्याधुनिक वाहने अग्निशमन विभागाकरिता अत्यंत आवश्यक असून खरेदी करणे गरजेचे आहे. परंतु ठाणे पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने पालिका निधीतून खर्च करण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. अग्निशमन दलाची वाहनांबाबत असलेली गरज व महापालिकेची नाजूक आर्थिक स्थिती लक्षात घेता वाहन खरेदीसाठी लागणारा खर्च जिल्हा वार्षिक योजना निधीतून करण्यात यावा. यासाठी 35 कोटी 35 लाख एवढा अंदाजे खर्च असल्याचे प्रशासनाने सांगितले.

■ आग विझवण्याकरिता मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर हे अत्याधुनिक अग्निशमन वाहन फार उपयुक्त आहे. यामध्ये असलेले चार बुम हे वेगवेगळ्या अंगलमध्ये फिरू शकतात त्यामुळे उंच इमारतीमध्ये आग लागलेल्या ठिकाणी बाहेरून पाणी मारून आग विझवणे शक्य होणार आहे.

■ अत्याधुनिक यंत्राच्या पुढील भागात असलेल्या कॅमेऱ्यामुळे तेथील सर्व परिस्थितीचा अंदाज घेता येऊ शकतो. लोकवस्तीमध्ये आग लागल्यास पाइप टाकण्याची आवश्यकता लागणार नाही.