
जीबीएसची दहशत राज्यात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत धुळे, ठाणे आणि वाडा येथून आलेले जीबीएस अर्थात गुलियन बॅरी सिंड्रोमचे तीन रुग्ण मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्यातील जीबीएसच्या रुग्णांचा एकूण आकडा 214 वर गेला आहे.
जे.जे. रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी दोन दिवसांपूर्वी नाशिकहून आलेल्या रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज भासत आहे. त्यामुळे त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे, तर ठाणे आणि वाडा येथून दोन रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना सर्वसाधारण वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. जीबीएसचे मुख्यतः प्रौढ रुग्णच रुग्णालयात येत आहेत, अशी माहिती जे.जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सुरवसे यांनी सांगितले. जीबीएसचा विषाणू सर्वात आधी फुप्फुसांवर किंवा श्वसन संस्थेवर हल्ला करतो. त्यानंतर पोटावर. मात्र रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असलेला रुग्ण तीन ते चार आठवडय़ांत बरादेखील होऊ शकतो, असे डॉ. संदीप सुरवसे म्हणाले. दरम्यान, रुग्णांना सर्व प्रकारच्या उत्तम सोयीसुविधा आणि उपचार उपलब्ध करून देण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले.
रुग्णाच्या संपर्कात आल्यासही धोका
जीबीएस हा आजार संसर्गजन्य नसल्याचे आणि दूषित पाणी तसेच शिळय़ा किंवा दूषित अन्नातून होतो असे वारंवार सांगण्यात आले. राज्याच्या आरोग्य विभागानेही हेच स्पष्ट केले. परंतु रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास आणि रुग्णाच्या संपर्कात आल्यास जीबीएस या आजाराची लागण होऊ शकते, असे डॉक्टर सुरवसे म्हणाले.