चोरीचे दागिने विकता येत नसल्याने तो अंगावर घालून फिरायचा, चोरट्याची नामी शक्कल

golden-chain-new
प्रातिनिधिक फोटो

गेल्या महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात सराफावर गोळीबार करून त्याच्याकडील सोन्याचे दागिने हिसकावून पळून गेलेल्या एका आरोपीला माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी दिल्लीतून उचलले. चोरीचे दागिने विकता येत नसल्याने ते अंगावर घालून तो फिरत होता. त्याने भारी शक्कल लढवली, पण अखेर पोलिसांनी त्याला पकडून दागिने हस्तगत केले.

जानेवारीच्या सुरुवातीला चिराग धंदुकिया व त्याचे नातेवाईक दोन दुचाकीवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जात होते. दुचाकीच्या मागे बसलेल्या व्यक्तीकडे सोन्याचे दागिने असलेली बॅग दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्यांना अडवून हिसकावून नेली होती. त्यावेळी आरोपींनी गोळीबार केला होता. हा प्रकार कळल्यानंतर एमआरए मार्ग पोलिसांनी  तपास करत किरण धनावडे आणि अरुण मढिया ऊर्फ घाची अशा दोघांना पकडून 16 लाख 50 हजार रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले होते. त्यातील अन्य दोघा आरोपींचा पोलीस कसून शोध घेत होते. अखेर एसीपी काशिद, वरिष्ठ निरीक्षक संतोष धनवटे, निरीक्षक फरीद खान यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष देवरे व पथकाने अचूक माग काढत जावेद शेख (40) या आरोपीला दिल्लीतून उचलले.