
मलबार हिलवरील समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवणाऱया 100 हून अधिक वनस्पतींसह निरनिराळे पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे निरीक्षण करण्याची संधी देणाऱ्या देशातील पहिल्या अनोख्या निसर्ग उन्नत मार्गाला मुंबईकरांसह पर्यटकांनी हाऊसफुल प्रतिसाद दिला आहे. पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत प्रत्येकी एका तासांच्या स्लॉटमध्ये एकावेळी केवळ 200 पर्यंटकांना प्रवेश देण्यात येतो. पर्यटकांनी या पाऊलवाटेला भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे याचे ऑनलाईन बुकिंग येत्या 15 एप्रिलपर्यंत फुल झाले आहे.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी ही संकल्पना पहिल्यांदा मांडून त्यासाठी 2021 साली महापालिकेची मंजुरी मिळवली होती. या उन्नत मार्गाचे लोकार्पण गुढीपाडव्यादिवशी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा मार्ग जमिनीपासून उंचीवर असल्यामुळे गिरगाव, महबार हिलपर्यंत पसरलेल्या मुंबईचे दर्शनही घेता येत असल्यामुळे फोटो, सेल्फीसाठीही पर्यटकांनी गर्दी केली होती. निसर्गाचा समतोल राखून बनवलेली ही पाऊलवाट पर्यावरण रक्षण आणि प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने आदर्श ठरणार आहे.
अशी करा ऑनलाईन बुकिंग
निसर्ग उन्नत मार्ग येथे भेट देण्यासाठी https://naturetrail.mcgm.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देऊन सशुल्क ऑनलाईन तिकीट काढण्याचा पर्याय आहे. हिंदुस्थानी नागरिकांसाठी 25 रुपये तसेच परदेशी नागरिकांना 100 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. मार्गावर एकाच वेळी जास्त गर्दी होऊ नये यासाठी एकावेळी 200 व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे. हा मार्ग पाहण्यासाठी प्रत्येकी एका तासाचे खंड (स्लॉट) करण्यात आले आहेत तसेच ऑनलाईन तिकीट नोंदणीत निर्माण झालेल्या बारकोडच्या सहाय्याने प्रवेश देण्यात येणार आहे. एका व्यक्तीला एका वेळेला केवळ सहा तिकिटे काढता येणार आहे. पुढील 15 दिवसांसाठी आगाऊ ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे.