
जम्मू आणि कश्मीर पोलिसांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील तीन संशयितांचे स्केच जारी केले आहेत. या संशयितांची नावे आसिफ फुजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी आहेत. जखमी आणि प्रत्यक्षदर्शींशी दिलेल्या माहितीच्या आधारे हे रेखाचित्र तयार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.
संशयितांना ओळखण्यास लोकांना मदत व्हावी म्हणून ही रेखाचित्र जारी करण्यात आली आहेत. तपास यंत्रणा आता या संशयितांच्या लपण्याच्या जागा आणि संपर्कांचा शोध घेत आहेत. गुप्तचर संस्थांच्या प्राथमिक तपासात अशी माहिती मिळाली आहे की, हल्ला करणारे दहशतवाद्यांनी पीर पंजाल टेकड्यांमधून हिंदुस्थानात घुसखोरी केली. त्यानंतर राजौरीहून चतरू आणि वाधवन ते पहलगाम असा प्रवास त्यांनी केला. हा परिसर रियासी आणि उधमपूर जिल्ह्यांजवळ येतो, जिथे गुज्जर आणि बकरवाल समुदायाची लोकसंख्या मोठी आहे. सामान्य लोकांच्या नजरेस पडू नये आणि कोणालाही संशय घेऊ नये, यासाठी दहशतवाद्यांनी हा मार्ग निवडल्याचे सांगण्यात आले. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांची रेखाचित्र जारी केली असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.