
जम्मू-कश्मीरातील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामच्या बैसरण खोऱ्यात भयंकर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी सरकारने पाकिस्तान विरोधात अनेक निर्णय घेतले. दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानींना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे एका सीआरपीएफ जवानाच्या पाकिस्तानी पत्नीलाही हिंदुस्थान सोडावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुनीर खान असे या CRPF जवानाचे नाव असून मिलन खान असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. मुनीर खान हे जम्मू जिल्ह्यातील घरोट्याचे रहिवाशी आहेत. पहलगामच्या दहशवादी हल्ल्यामुळे हिंदुस्थानने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला आणि हिंदुस्थानातील सगळ्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले.
दरम्यान, सरकारच्या निर्णयानंतर मिलन खान यांना जम्मूहून पाकिस्तानला परत पाठवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सरकारने जारी केलेले हे आदेश मिलन खान यांना मान्य नव्हते. पाकिस्तानला जाण्याऐवजी हिंदुस्थानात राहण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. आम्हाला कुटुंबासोबत राहण्याची परवानगी दिली पाहिजे. पहलगाममधील हल्ल्यात निष्पाप लोकांच्या झालेल्या क्रूर हत्येचा आम्ही निषेध करतो. त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
कसे झाले लग्न-
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलन ही पाकिस्तानातील पंजाब प्रदेशाची रहिवासी आहे. ती पाकिस्तानातील पंजाबमधील गुजरांवाला भागातील रहिवासी आहे. मुनीर आणि मिलन यांनी ऑनलाईन विवाह केला होता. 24 मे 2024 रोजी या जोडप्याचे लग्न झाले. व्हिसा न मिळाल्याने त्यांनी एक अनोखी पद्धत अवलंबली आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लग्न केले होते.