
कॉमेडीयन कुणाल कामराच्या यूटय़ूब चॅनेलवर बंदी आणण्याची मागणी करणाऱया मिंधे गटाचे आमदार किरण सामंतांना उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक दिली. अशा मागण्यांसाठी कायद्याने पर्याय दिले आहेत, तेथे जाऊन दाद मागा, असे खडेबोल सुनावत न्यायालयाने आमदार सामंतांनी दाखल केलेली जनहित याचिकाच निकाली काढली.
सध्या सोशल मीडियाचा गैरवापर होत आहे. या माध्यमाद्वारे चुकीच्या पद्धतीने टीका केली जात आहे. यावर निर्बंध घालायला हवेत. तसे आदेश न्यायालयाने द्यावेत. कुणाल कामराने वारंवार अयोग्यपणे विडंबन केले आहे. त्याच्या यूटय़ूब चॅनेलवर बंदी आणावी, यासह विविध मागण्या आमदार सामंतांनी याचिकेत केल्या होत्या.
मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर या जनहित याचिकेवर सुनावणी झाली. आयटीसह अन्य कायद्यांतर्गत अशा तक्रारी करण्यासाठी पर्याय दिले आहेत. त्यानुसार तुम्ही अर्ज करू शकतात, असे नमूद करत कोणताही दिलासा देण्यास नकार देत खंडपीठाने ही याचिका निकाली काढली.
तुम्ही आमदार आहात, कायदा करू शकता
तुम्ही विधिमंडळाचे सदस्य आहात. निर्बंध घालण्यासाठी तुम्ही कायदा करू शकता. यासाठी कोर्टात येण्याची गरज नाही, असेही न्यायालयाने आमदार सामंतांना सुनावले.