आता क्यूआर कोडवरून समजणार एक्स्प्रेसची वेळ!

मध्य रेल्वेवर लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता गाडय़ांचे वेळापत्रक जाणून घेणे सोपे झाले आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेल येथून सुटणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाडय़ांच्या वेळापत्रकासाठी क्यूआर कोड कार्यान्वित केला आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासात मेल-एक्स्प्रेस गाडय़ांचा तपशील जलद व सोयीस्करपणे उपलब्ध होणार आहे. यासाठी मध्य रेल्वेने क्यूआर कोडआधारित माहिती प्रणाली सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना साध्या स्कॅनद्वारे मेल-एक्स्प्रेस गाडय़ांचे वेळापत्रक जाणून घेता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेल येथून निघणारे प्रवासी स्थानकांवर उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन करू शकतील.