
मोगल मर्दिनी रणरागिणी छत्रपती ताराराणी यांच्या सातारा जिह्यातील संगममाहुली येथील नदीकाठी असलेल्या मूळ समाधीचा जीर्णोद्धार करून तेथे मेघडंबरी बांधावी तसेच छत्रपती पहिले शाहू महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्या समाधी स्मारकांचेही जतन करण्यात यावे, यासाठी पुरातत्व खात्याने या ऐतिहासिक स्थानाला संरक्षित पुंपण करावे, अशी मागणी येथील सखीसंपदा मंचच्या वतीने अध्यक्षा स्वप्नजा घाटगे यांच्याकडून करण्यात आली आहे.
सखीसंपदा चॅरिटेबल मंचच्या पदाधिकाऱ्यांनी सातारा जिह्यातील संगममाहुली येथील समाधी स्थळ परिसरात पाहणी केली असता, येथील दुर्दशेवरून त्यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. छत्रपती ताराराणी यांच्या नदीकाठी असलेल्या चरणशिळा महाराणी येसूबाई राणीसाहेब यांच्या समाधीजवळील एका शिवमंदिरातील चौथऱ्यावर, उघडय़ावर ठेवण्यात आलेल्या आहेत. तर छत्रपती पहिले शाहू महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्या समाधी स्मारकांची नीट निगराणी राखली जात नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महाराणी छत्रपती ताराराणी यांच्या चरणशिला मूळ ठिकाणी बसवून तेथे मेघडंबरी बांधण्यात यावी. तसेच हा परिसर पुरातत्व खात्याने संरक्षित करावे, अशी मागणीही सखीसंपदा मंचकडून करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांना पत्रे पाठवण्यात आली आहेत.