WAVES 2025 हिंदुस्थान म्हणजे सांस्कृतिक वारसा आणि नवोन्मेषाचे मिश्रण; नीता अंबानी यांचं प्रतिपादन

nita ambani waves 2025

रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी सध्या सुरू असलेल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट (WAVES) 2025 च्या दुसऱ्या दिवशी ‘Taking Indian Culture to the World’ (जगाच्या कानाकोपऱ्यात हिंदुस्थानी संस्कृती पोहोचवणे) या विषयावर आपलं मत मांडलं. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर (JWCC) येथील गर्दीने भरलेल्या सभागृहात, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात, नीता अंबानी यांनी हिंदुस्थानातील ‘पवित्र परंपरा’ आणि ‘आधुनिक गतिमानता’ याच्या प्रभावशाली एकत्रित वाटचालीवर प्रकाश टाकला.

‘आपण आपल्या संस्कृतीच्या ज्ञानाने समृद्ध असलेला देश आहोत, परंतु जगातील सर्वात तरुण लोकसंख्येच्या धडधडणाऱ्या उर्जेने तितकेच उत्साही आहोत. एक असा देश जिथे पवित्र परंपरा आधुनिक गतिमानता यांच्यात सुसंवाद पाहायला मिळतो. यामुळेच आपली अर्थव्यवस्था लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे’, असे नीता अंबानी म्हणाल्या.

हिंदुस्थानच्या समृद्ध इतिहासाचा विचार करताना, नीता अंबानी यांनी नमूद केले की आपले राष्ट्र ‘ओम’ या शब्दाचे मूळ आहे आणि संस्कृतचे घर आहे, जी जगभरातील अनेक भाषांचा आधार आहे.

रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षांनी WAVES 2025 मध्ये आपल्या भाषणात योग, आयुर्वेद, विज्ञान, कला, शास्त्रीय संगीत आणि नृत्य यासह इतर क्षेत्रांमध्ये हिंदुस्थानच्या योगदानावर प्रकाश टाकला.