मुस्लीम फेरीवाल्यांना मारहाण करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांना अटक करा, पोलिसांना धारेवर धरत काँग्रेसची मागणी

भाजप पदाधिकाऱ्यांनी गुंडगिरी करत दादरमध्ये मुस्लीम फेरीवाल्यांना मारहाण केली आणि त्यांना धमकावत त्यांच्या वस्तू लुटल्या, हा प्रकार अत्यंत गंभीर असून या सर्वांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी काँग्रेसने परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

भाजप पदाधिकारी अक्षता तेंडुलकर यांच्यासह 9 जणांविरुद्ध सौरभ मिश्रा यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या सर्वांवर मुस्लीम फेरीवाल्यांना टार्गेट करून हप्ता वसुली करण्याचाही आरोप आहे. एका धर्माच्याच फेरीवाल्यांना लक्ष्य करून प्रक्षोभक भाषा वापरत धार्मिक तेढ निर्माण करण्याचाही प्रकार घडला आहे. या प्रकरणात आवश्यक कलमे संबंधितांवर लावली गेली नाहीत, याकडे शिष्टमंडळाने उपायुक्तांचे लक्ष वेधले.

सीमेवरील तणावामुळे देशात सौहार्दाचे वातावरण असणे आवश्यक असताना अशा गंभीर गुह्यात पोलीस गप्प का बसलेत, असा सवालही शिष्टमंडळाने केला. शिष्टमंडळात मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी खासदार हुसेन दलवाई, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस राजन भोसले, संध्या गोखले, संध्या म्हात्रे, शमा दलवाई, श्वेता दामले, इरफान इंजिनियर, प्रताप आसबे यांचा समावेश होता.