
गुजरातमधील डायमंड सिटी असलेल्या सूरतमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 19 वर्षीय मॉडेलचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत सापडला. मॉडेल बनण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या या तरुणीचे नाव सुखप्रीत कौर असे होते. ती मूळची मध्य प्रदेशची रहिवासी होती आणि काही दिवसांपूर्वीच सूरतमध्ये एका मॉडेलिंग प्रोजेक्टसाठी आली होती.
मध्य प्रदेशातील या मॉडेलच्या मृत्यूने केवळ तिच्या कुटुंबालाच नव्हे तर मॉडेलिंग क्षेत्रही हादरले आहे. ती सारोली परिसरातील कुंभारिया गावात असलेल्या सारथी रेसिडेन्सीमध्ये मैत्रिणींसोबत एका खोलीत भाड्याने राहत होती. संध्याकाळी तिच्या रूममेटपैकी एक मैत्रिण घरी परतल्यावर तिला सुखप्रीतचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर तिने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांनी केलेल्या तपासात मॉडेलने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मात्र घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नसल्याने पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करत आहेत.


























































