करारा जवाब देऊ! मोदींची पुन्हा धमकी

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला बारा दिवस झाले. पाकिस्तानला धडा शिकवा, ‘घुस के मारेंगे’ची कारवाई करा, अशी देशवासियांकडून मागणी होत आहे. मात्र, अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानला पुन्हा धमकी दिली आहे. कठोर आणि निर्णायक कारवाई करण्यास हिंदुस्थान वचनबद्ध असून, करारा जवाब देंगे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

अंगोलाचे अध्यक्ष जोआओ मॅन्युएल गोन्काल्व्होस लॉरेन्को हे हुंदस्थान दौऱ्यावर आले आहेत. यावेळी संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले, दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे. दहशतवाद आणि त्यांना पाठिंबा देणाऱयांविरुद्ध कठोर आणि निर्णायक कारवाई करण्यास हिंदुस्थान वचनबद्ध असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला यापूर्वीही इशारे दिले आहेत. हल्ल्याच्या दुसऱया दिवशी 23 एप्रिलला सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर आम्ही प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांना शोधून काढू आणि कठोर कारवाई करू, असा इशारा दिला होता.

ओमर यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

जम्मू आणि कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जवळपास अर्धा तास मोदी आणि अब्दुल्ला यांच्यात जम्मू-कश्मीरमधील सद्यस्थितीवर चर्चा झाली.