महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा धोका,पाच दिवस झोडपणार; आयएमडीचा इशारा

राज्याच्या विविध भागांतील तापमानाने चाळिशी ओलांडल्यामुळे उकाडय़ाने नागरिकांचा घामटा निघाला आहे. अशातच आता अवकाळी पावसाचे संकट राज्यातील शेतकऱयांपुढे उभे राहणार आहे. पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाला अवकाळी पावसाचा इशारा हवमान विभागाकडून देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, सध्या चक्राकार वाऱयांची स्थिती राजस्थानसह मध्य प्रदेशात सक्रीय असल्याने महाराष्ट्रात पुढील पाच दिवस अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. 3, 4 आणि 5 मे रोजी विदर्भासह मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ातील काही जिह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडय़ातील काही जिल्हांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार आहे. गेल्या आठवडाभरापासून विदर्भातील काही जिह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता.

पावसाचा इशारा कुठे व कधी?

4 मे – नाशिक, अहिल्या नगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली (येलो अलर्ट). मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हांमध्ये पावसाची शक्यता आहे.

5 मे – संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ सर्व विभागांमध्ये बहुतांश ठिकाणी अलर्ट.

6 मे – सातारा, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, अहिल्या नगर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात उर्वरित ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज.

7 मे – संपूर्ण कोकण पट्टा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व बहुतांश मराठवाडय़ात अवकाळी पावसाचा इशारा.

मुंबईकरांना उन्हाचे चटके

मे महिना मुंबईकरांसाठी तापदायक ठरत असून उकाडय़ाने सगळेच हैराण झाले आहेत. शनिवारी कुलाबा येथे 34.2 तर, सांताक्रुझ येथे 34.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. आर्द्रतेचे प्रमाण 77 ते 82 टक्के यादरम्यान होते.

नागपुरात गारपीट

नागपूरचा उन्हाचा पारा 45 अंशांवर गेल्याने नागपूरकरांचे बाहेर पडणे मुश्किल झाले होते. संपूर्ण अंगाची लाहीलाही होत होती. मात्र नागपूर शहरातील पारडी, शांती नगर भागात शनिवारी जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडला तर काही ठिकाणी सोसाटय़ाच्या वाऱयासह जोरदार अवकाळी पावसाने झोडपले. मागील दोन दिवसांपासून नागपूर शहरातील तापमानात घट झाली होती. हवामान विभागाकडून विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पावसामुळे उकाडय़ाने हैराण झालेल्या नागपूरकरांनी काहीसा गारवा अनुभवला.