IPL 2025 – म्हात्रे-जडेजाची झुंजार खेळी व्यर्थ, थरारक विजय मिळवत बंगळुरूनं 18 वर्षांत पहिल्यांदाच ‘असा’ कारनामा केला

अखेरच्या चेंडूपर्यंत उत्कंठावर्धक झालेल्या लढतीत रॉजय चॅलेंजर्स बंगळुरू संघाने चेन्नई सुपर किंग्जचा 2 धावांनी पराभव केला. या विजयामुळे बंगळुरूचे 16 गुण झाले आहेत. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बंगळुरूने प्ले ऑफचे तिकीटही जवळपास पक्के केले आहे.

बंगळुरूने विजयासाठी दिलेले 214 धावांचा पाठलाग करताना चेन्नईने 19 षटकापर्यंत 5 बाद 199 धावा केल्या होत्या. अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी 15 धावांची आवश्यकता होती. पाटीदारने चेंडू यश दयालकडे सोपवला. त्याने पहिल्या दोन चेंडूवर सिंगल दिली. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर धोनी बाद झाला.

धोनी बाद झाल्यानंतर चेन्नईने शिवम दुबेला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरवले. त्याने आल्या आल्या यश दयालच्या षटकातील चौथ्या चेंडूवर षटकार लगावला. हा चेंडू नो बॉल ठरल्याने चेन्नईला विजयासाठी 3 चेंडू 6 धावा असे समीकरण झाले. पण यश दयालने पुढचे 3 चेंडू अचूक यॉर्कर टाकत फक्त 3 धावा दिल्या आणि बंगळुरूने 2 धावांनी थरारक विजय मिळवला. विशेष म्हणजे इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात पहिल्यांदाच बंगळुरूने एका हंगामातील दोन्ही लढतीत चेन्नईला पराभवाचे पाणी पाजले आहे.

डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात चांगली झाली. आयुष म्हात्रे आणि शेख रशिद यांनी चेन्नईला अर्धशतकीय सलामी दिली. त्यानंतर शेख रशीद आणि सॅम करण लागोपाठच्या षटकांमध्ये बाद झाल्याने चेन्नईचा डाव संकटात सापडला. 17 वर्षीय आयुष म्हात्रे आणि रविंद्र जडेजाने हा डाव सावरला आणि शतकीय भागिदारी केली. दोघांनी तुफानी फलंदाजी करत चेन्नईला विजयाची कवाडे उघडून दिली. म्हात्रेने 48 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 94 धावा केल्यास तर जडेजा 77 धावांवर नाबाद राहिला. शेवटच्या षटकात एक फ्री हिट मिळाल्यानंतरही चेन्नईला 15 धावा करता आल्या नाहीत, त्यामुळे बंगळुरूने 2 धावांनी विजय मिळवला.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि जेकब बेथेल या जोडीने बंगळुरूला सुस्साट सुरुवात करून दिली. दोघांनी दहाच्या सरासरीने धावा चोपत 97 धावांची सलामी दिली. बेथेल 33 चेंडूत 55 धावा करून बाद झाला. त्यानतंर कोहलीही 33 चेंडूत 62 धावा करून माघारी परतला. मधल्या षटकांमध्ये पडीक्कल, रजत पाटीदार, जितेश शर्मा यांना धावगती राखता आली नाही, मात्र अखेरच्या षटकांमध्ये रोमारियो शेफर्डने चौकार, षटकारांची आतिषबाजी करत अवघ्या 14 चेंडूत 53 धावा कुटल्या आणि बंगळुरूला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.