
‘पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर अनेक दुर्दैवी बाबी पुढे येत आहेत. गुन्हेगारीसाठी अल्पवयीनांचा उपयोग केला जात आहे. कायद्याने अल्पवयीनांना शिक्षा देता येत नसल्याने त्यांच्या हाती बंदुका देऊन दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत. त्यामुळे वयाचा मुलाहिजा न बाळगता अतिरेक्यांचा खात्मा केला पाहिजे,’ असे परखड मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी जलमंदिर पॅलेस येथे दिलेल्या भेटीनंतर खासदार उदयनराजे पत्रकारांशी बोलत होते. अतिरेक्यांना कुठली जात, धर्म नाही. पहलगाम येथे घडलेला प्रकार अत्यंत किळसवाणा आहे. या प्रकाराने वेदना होतात, या प्रकाराची गुन्हेगारी थांबवायची असेल, तर तिथे काही बघता कामा नये. गुन्हेगार मग तो 16-17 वर्षांचा का असेना, त्याला सुट्टी द्यायची नाही. याच मुलांचा उपयोग गुन्हेगारीसाठी केला जात आहे. त्यांच्याकडून गुन्हा घडल्यानंतर त्याला रिमांडहोममध्ये पाठवले जाते, तिथून त्याची कधी सुटका होते, ते कळतही नाही. त्यांच्या हाती बंदुका असतात. तो कुणाला मारू शकत असेल तर अशांचा खात्मा झालाच पाहिजे. त्याचप्रमाणे अतिरेक्यांचे ट्रेनिंग कॅम्पस उद्ध्वस्त करून टाकले पाहिजेत, असेही उदयनराजे यांनी सांगितले.
या वेळी सुनील काटकर, काका धुमाळ, पंकज चव्हाण, अजय मोहिते आदी उपस्थित होते.