आमदार राणा पाटीलच कळीचा नारद! 268 कोटींच्या कामांना स्थगिती देण्यासाठी राणांचीच तक्रार, पालकमंत्र्यांची स्पष्ट कबुली

धाराशिव जिल्ह्यातील 268 कोटींच्या विकास कामांना शासनाने अचानक स्थगिती दिली. या स्थगितीवरून शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी ‘कळीचा नारद’ असा सवाल केला होता. दस्तुरखुद्द पालकमंत्र्यांनीच आमदार जगजीतसिंह राणा पाटील यांच्या तक्रारीवरूनच या कामांना स्थगिती देण्यात आल्याची स्पष्ट कबुली दिल्याने ‘कळीचा नारद’ कोण, याचे उत्तर धाराशिवकरांना मिळाले आहे.

धाराशिव जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या 268 कोटी रुपयांच्या विकास कामांना शासनाने अचानक स्थगिती दिली. शासनाच्या या पक्षपाती धोरणामुळे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे भयंकर संतापले. भरबैठकीत त्यांनी विकास कामांना स्थगिती देण्यासाठी तक्रार करणारा ‘कळीचा नारद’ कोण, असा संतप्त सवाल केला. त्यावर पालकमंत्री प्रताप सरनाईकही उत्तर देऊ शकले नव्हते.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री धाराशिवमध्ये होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी 268 कोटींच्या कामांना स्थगिती देण्यासाठी तक्रार करणारा ‘कळीचा नारद’ कोण हे पत्रकारांना सांगितले. भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या तोंडी तक्रारीवरूनच या कामांना स्थगिती देण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी थेट सांगितले. जिल्ह्याचा विकास व्हावा ही आपली भूमिका आहे. त्यामुळे या कामांबद्दल पुनर्विचार करण्यात यावा, असे आपण शासनाला कळवणार असल्याचेही ते म्हणाले.

मी आहे दादा, मला पालकमंत्री करा

आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी भाजपशी सोयरिक केल्यापासून मंत्रिपद त्यांना हुलकावणी देत आहे. मिंधे सरकारमध्ये तानाजी सावंत हे पालकमंत्री झाले होते. आमदार राणा पाटील आणि तानाजी सावंत यांचे जमलेच नाही. लोकसभेच्या निवडणुकीत तानाजी सावंतांनी त्याचा उघड उघड वचपा काढला. आता मिंधे गटाचे प्रताप सरनाईक धाराशिववर लादण्यात आले आहेत. भाजपमध्ये प्रवेश करून नेमके काय मिळवले, असा प्रश्न आमदार राणा पाटलांच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.