
पहलगाम हल्ल्याला 12 दिवस झाले तरी सरकारने याचा बदला घेतला नाही असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच पाकिस्तानचे 21 युट्युब चॅनेल बंद केले, पाकिस्तानच्या हायकमिनशनचा स्टाफ कमी केला याला बदला म्हणत नाही असेही संजय राऊत म्हणाले.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, 12 दिवस होऊन गेले. आमचे 27 निरपराध लोकं दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मारले गेले. दररोज बातम्या येत आहेत, या नाड्या आवळल्या, या नाड्या सोडल्या. पाकिस्तानचे 21 युट्युब चॅनेल बंद केले, पाकिस्तानच्या हायकमिनशनचा स्टाफ कमी केला. याला काय बदला घेणे म्हणतात काय? तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता, त्यांचे पक्ष फोडून टाकता, त्यांना तुरुंगात टाकता, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करता, त्यांच्या कुटुंबीयांचा छळ करता. समोर आपला कोणताही राजकीय शत्रू नको, त्यांना संपवता. मग पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवळल्या, त्या नाड्या आवळल्या, पाकिस्तानची एअरबेस बंद केली, युट्यूब चॅनेल बंद केलं याला काय बदला म्हणतात. 27 लोक मारले गेल्यावर बदला कसा घेतला पाहिजे. इंदिरा गांधीचा इतिहास पहा, त्यांना नेहरु इंदिरा गांधींचा त्रास होतो. पंतप्रधान मोदींनी कुठलाही बदला घेतलेला नाही. या देशाची मला भिती वाटते. अशा प्रकारचे राज्यकर्ते या देशात असतील आणि शत्रू इतक्या समोर माजलेला असेल. तर आमच्या बदल्याची पद्धत काय तर नाड्या आवळण्याची आणि युट्यूब चॅनेल बंद करण्याची. तसेच हे लोक आता फक्त भाजपच्या विरोधकांना चून चून के मारत आहेत आणि ते ही आता शक्य नाही. 12 दिवस झाले तरी ते बदला घेत आहेत आणि आता युद्ध सराव घेत आहेत असेही संजय राऊत म्हणाले.
17 मे रोजी नरकातला स्वर्ग माझ्या पुस्तकाचे प्रकाशन आहे. हे पुस्तक जे आहे माझ्या तुरुंगातले जे माझे अनुभव आहेत सरकारने जे आम्हाला नरकात पाठवलं आणि नरकात पाठवून गुडगे टेकले नाही. आम्ही त्या नरकाला स्वर्ग मानला आणि त्यात राहिलो. शंभर दिवसाच्यावर त्याचे अनुभव आहेत. फार मोठं पुस्तक नसेल पण त्यातून लढणाऱ्यांना प्रेरणा मिळावी देशासाठी स्वातंत्र्यासाठी लोकशाहीसाठी लढणारी जी एक पिढी आहे त्यांना जर काही मी प्रेरणा देऊ शकलो त्यातून त्यासाठी मी पुस्तक लिहिलं. प्रख्यात लेखक कवी पटकथाकार जावेद अख्तर पुस्तकाचे प्रकाशन करतील. माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि माझे संसदेतले सहकारी साकेत गोखले त्यांनाही तुरुंगात टाकले होते. ते या सोहळ्यामध्ये उपस्थित राहतील. आणि एक प्रेरणादायी सोहळा रवींद्र नाट्य मंदिरला 17 मेला सायंकाळी सहा वाजता होईल. हा कार्यक्रम सगळ्यांसाठी आहे असे संजय राऊत म्हणाले.
तसेच ज्यांना ज्यांना या हुकुमशहा विरुद्ध लढायचं आहे, ज्यांना या लोकशाहीच्या रक्षणासाठी लढायचं आहे आणि ज्यांना भविष्यामध्ये कधीच या लोकांसमोर गुढगे टेकायचे नाहीये त्या प्रत्येकाने यावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि आता त्या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे असेही संजय राऊत म्हणाले.