दिल्ली डायरी – योगींचा ‘ठाकूरवाद’ भाजपच्या मुळावर!

>> नीलेश कुलकर्णी, [email protected]

‘उत्तर प्रदेश में ठाकूरोंकाही राज है और रहेगा,’ असे विधान सार्वजनिकरित्या भाजपचे उत्तर प्रदेशचे मंत्री रघुराजसिंग यांनी केले. त्यामुळे हिंदुत्वाच्या गावगप्पा मारणाऱया मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांचे सरकार समस्त हिंदूंचे नसून केवळ ठाकूर या एका जातीसमूहाचे आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. योगींच्या एककल्ली ‘ठाकूरवादा’मुळे हिंदुत्वाच्या अजेंड्यापोटी भाजपकडे आकर्षित झालेल्या अनेक जाती व पोटजाती भाजपपासून दूर जात आहेत. त्याचा मोठा फटका भाजपला बसू शकतो.

पराक्रमी राजपूत राजे राणा सांगा यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी करणारे समाजवादी पक्षाचे खासदार रामजीलाल सुमन यांच्यावर उत्तर प्रदेशात करणी सेनेकडून जीवघेणे हल्ले होत आहेत. करणी सेनेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खुली सूट दिली आहे. करणी सेनेच्या तलवारीच्या जोरावर उत्तर प्रदेशमध्ये जरब व दहशत बसविण्याचा योगींचाच डाव असल्याचे बोलले जात आहे. त्यात समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी योगींचे राज्य ठाकूरराज कसे याचे पुरावे देणारे पत्रकच जारी केले आहे. या पत्रकात पोलीस ठाण्यातील दरोगा ते महत्त्वाच्या पोस्टिंग केवळ ठाकूरांनाच कशा दिल्या जातात, इतर समाज कसा उपेक्षित ठेवला जातो, याचे विस्तृत विवेचन आहे. योगींच्या या आडमुठय़ा भूमिकेमुळे हिंदुत्वाच्या अजेंडय़ापोटी आकर्षित झालेल्या अनेक जाती व पोटजाती भाजपपासून दूर जात आहेत. त्याचा मोठा फटका भाजपला बसू शकतो.

उत्तर प्रदेशमधील मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय समाज भाजपकडे आकर्षित करण्यात नरेंद्र मोदींची मोठी भूमिका राहिलेली आहे हे नाकारून चालणार नाही. मोदींचे उत्तर प्रदेशमधून लोकसभा निवडणूक लढविणे, स्वतःला ओबीसी म्हणून प्रोजेक्ट करणे, यामुळे भाजपचे राजकीय गणित सर्वाधिक खासदार निवडून देणाऱया उत्तर प्रदेशमध्ये चांगलेच जमून आले, मात्र योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर ते ज्या पद्धतीने कारभार करीत आहेत त्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. योगी हे जातीयवादी असल्याची टीका पहिल्यापासून होत होती. मात्र ती दबक्या आवाजात होती. आता त्याला जाहीर व्यासपीठ मिळाले आहे. हरिशंकर तिवारी या दबंग नेत्याशी योगींची दुश्मनी होती. त्या तिवारींचा गोरखपूरमधला हाथा योगींनी तोडला. त्यामुळे ब्राह्मण समाज क्षुब्ध आहे. योगींच्या राज्यात आपल्यावर जाणीवपूर्वक अन्याय केला जात असल्याची भावना निर्माण झाल्याने हा समाज समाजवादी पार्टीकडे आकर्षित होत आहे. राज्यात दलित, ओबीसी व इतर समाजघटकांची अवस्था त्याहूनही वाईट आहे. सावित्रीबाई फुले या भाजपच्या माजी महिला खासदाराला योगींनी केवळ त्या दलित आहेत म्हणून भेटीची वेळ नाकारली होती, अशी वंदता आहे. योगी महाराज ठाकूरांच्या बाहुबलींना संरक्षण देऊन इतर बाहुबलींचे ‘एन्काऊंटर’ करतात. योगींचे एकदम खासमखास असलेले शिशिरसिंग हे अधिकारी गेली आठ वर्षे माहिती विभागाचे प्रमुख होते. ते यामागचा ‘ब्रेन’ असल्याचे सांगितले जाते. शिशिंरसिंगांनी ठाकूर लॉबी हाताशी धरून मोदी-शाह यांच्या विरोधातच बातम्यांचा अजेंडा राबवायला सुरुवात केल्यानंतर मोदींनी कडक भूमिका घेत शिशिर सिंग यांची उचलबांगडी करायला भाग पाडले आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’ ही भाजपची लोकप्रिय घोषणा आहे. दुर्दैवाने उत्तर प्रदेशमध्ये योगींच्या राज्यात हिंदूमध्ये ‘बटेंगे’ ची स्थिती निर्माण झाली आहे.

‘जेएनयू’ चा धडा

दिल्लीचे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे कायमस्वरूपी चर्चेच्या पेंद्रस्थानी असते. मोदींचे सरकार दिल्लीत आल्यानंतर तर अनेकविध कारणांसाठी हे विद्यापीठ वादाच्या भोवऱयात सापडले. चर्चेत आले. अर्थात ‘जेएनयू म्हणजे देशद्रोह्यांचा अड्डा’, हे नरेटिव्ह भाजपच्या लोकांनी व्यवस्थितपणे जनमानसाच्या मनावर ठसवले आहे. त्याचवेळी आपले विद्यार्थी संघटन अभाविपलाही पाठबळ दिले. त्यामुळेच तब्बल दहा वर्षांनंतर जेएनयूच्या छात्रसंघाच्या निवडणुकीत सेंट्रल पॅनलमध्ये संयुक्त सचिव पदावर विद्यार्थी परिषदेचा उमेदवार निवडून आला आहे. वास्तविक, जेएनयूचा पेपर विद्यार्थी परिषदेसाठी सोपा नक्कीच नव्हता. मात्र चांगली व्यूहरचना व सत्तेचे पाठबळ या जोरावर विद्यार्थी परिषदेने कमबॅक केले. या कमबॅकला विरोधी पक्षातील बेदिलीही कारणीभूत आहे. इंडिया आघाडीतील पक्षांच्या ज्या विद्यार्थी संघटना आहेत त्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला होती. डाव्यांच्या विद्यार्थी संघटनांमध्येही बेबनाव होता. त्याचा पुरेपूर फायदा विद्यार्थी परिषदेने उचलला. ‘बटेंगे तो कटेंगे’ हा धडा जेएनयूने दिला आहे.