
मुंबईहून प्रवाशांना घेऊन कोकणात जाणाऱ्या खासगी लक्झरी बसचालकाचा ताबा सुटून ही बस कर्नाळा खिंडीत उलटली. ही घटना रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत बसखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे कळते, तर 35 प्रवासी गंभीर जखमी झाले. एका चिमुकलीचा पाय पत्र्याने कापला गेल्याने तिच्यावर एमजीएम रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीची काही तास प्रचंड कोंडी झाली.
ओमकार ट्रव्हल्सची ही खासगी बस मुंबईहून कोकणात प्रवासी घेऊन निघाली होती. चालकाचा ताबा सुटल्याने कर्नाळा खिंडीजवळ बस उलटून अपघात घडला. बस एका बाजूला उलटी झाल्याने बसमधील 35 प्रवासी आतच अडपून पडले. या दुर्घटनेत दोन गंभीर जखमी प्रवाशांचा मृत्यू आल्याचे सांगण्यात आले, तर लावण्या सावंत या चिमुकलीचा पायच बसच्या धारदार पत्र्यामुळे कापला गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांकडून तातडीने मदतकार्य सुरू झाले. अपघातातील सर्व जखमींना तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लावण्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. अपघातानंतर मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू असल्याने मुंबई- गोवा महामार्गावर दोन्ही बाजूला प्रचंड वाहतूककोंडी झाली होती.