खारवासीयांची प्रदूषणापासून होणार सुटका, शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे स्मशानभूमीचे नूतनीकरण

गेल्या अनेक महिन्यांपासून खार स्मशानभूमीत पार्थिवांचे दहन केल्यानंतर येत असलेल्या उग्र दर्पामुळे परिसरातील आबालवृद्ध नागरिक त्रस्त आहेत. त्याचबरोबर प्रदूषणामुळे अनेक नागरिकांना श्वसनविकार जडले आहेत. रहिवाशांच्या तक्रारींची दखल घेत शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खार स्मशानभूमीच्या नूतनीकरणाला मंजुरी मिळवली आहे. त्यामुळे लवकरच खार स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्यात येणार असून रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.

शिवसेनेच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या धोरणानुसार विविध नागरी विकासकामे करण्यात येत आहेत. शिवसेनेने नेहमीच स्थानिकांना केंद्रस्थानी ठेवून समस्या सोडवण्यावर भर दिला आहे. खारमधील रहिवाशांकडून स्मशानभूमीत होणाऱ्या प्रदूषणाबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर, आता स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्यात येणार  आहे. त्याचबरोबर खार स्मशानभूमीतील चिमण्यांच्या दुरुस्तीचे कामदेखील केले जाणार आहे. त्यामुळे येथील रहिवाशांची खार स्मशानभूमीतून होत असलेल्या प्रदूषणापासून सुटका होणार आहे, अशी माहिती शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर यांनी दिली.