नासाने संस्कृतवर शोधनिबंध लिहिले

देववाणी म्हणून ओळखली जाणारी संस्कृत ही वैज्ञानिक भाषा असून नासाच्या शास्त्रज्ञांनीही ही बाब मान्य केल्याचा दावा दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केला. इतकेच नव्हे तर संस्कृत ही कम्प्युटरला अनुरूप अशी भाषा असून त्यात कोडिंगही करता येते, असे सांगत त्यांनी संस्कृतचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.

दिल्लीत झालेल्या दहा दिवसांच्या संस्कृत शिक्षण उपक्रमाच्या समारोप समारंभात त्या बोलत होत्या. नासाच्या शास्त्रज्ञांनी संस्कृतवर शोधनिबंध लिहिले आहेत आणि ती एक वैज्ञानिक भाषा असल्याचे मान्य केले आहे, अशी माहिती गुप्ता यांनी दिली. 1985 मध्ये एका मासिकात प्रकाशित झालेल्या संशोधन निबंधाचा आधार घेत त्यांनी, प्राचीन संस्कृत व्याकरणकारांनी संस्कृतची केलेली रचनाच अशी आहे की तिचा कोडिंगसाठी वापर करता येईल. त्यामुळे एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासातही संस्कृत योगदान देऊ शकते, असा दावा त्यांनी केला.