ठाणे, पालघरमधील कंत्राटी रुग्णवाहिका चालकांना दिलासा; हायकोर्टाने सेवा कायम करण्याच्या आदेशावर केले शिक्कामोर्तब

ठाणे, पालघरमधील सिव्हिल सर्जन सिव्हिल हॉस्पिटलमधील कंत्राटी रुग्णवाहिका चालकांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. या कंत्राटी रुग्णवाहिका चालकांची सेवा कायम करण्याच्या महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाच्या (मॅट) आदेशावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.

मॅटच्या आदेशाविरोधात या दोन रुग्णालयांनी अपील याचिका दाखल केली होती. न्या. अतुल चांदुरकर व न्या. मिलिंद साठय़े यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. मॅटचे आदेश रद्द करण्याची मागणी रुग्णालयांनी केली. कंत्राटी रुग्णवाहिका चालक कल्पेश बिनरसह आठ जणांकडून अॅड. सुगंध देशमुख यांनी या मागणीला विरोध केला. मॅटचे आदेश योग्यच आहेत, असा दावा अॅड. देशमुख यांनी केला. तो मान्य करत न्यायालयाने मॅटच्या आदेशात दोष नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला व रुग्णालयांची याचिका फेटाळून लावली.

ठाणे, पालघरमध्ये रुग्णवाहिका चालकांची 14 पदे रिक्त आहेत, असे नमूद करत मॅटने कंत्राटी रुग्णवाहिका चालकांची सेवा कायम करण्याचे आदेश दिले.