
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानची आर्थिक कोंडी सुरू केली आहे. सरकारने पाकिस्तानमधून थेट किंवा मध्यस्थ राष्ट्रांद्वारे होणाऱ्या सर्व आयातींवर बंदी घातली आहे, तसेच शेजारील देशातून टपाल सेवा आणि पार्सल वितरण देखील केले आहे.
प्रशासनाने पाकिस्तान-नोंदणीकृत जहाजांना हिंदुस्थानी बंदरांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.
‘अप्रत्यक्ष आयातीसह मोठ्या प्रमाणात बंदी घालण्यात आली आहे. ज्यामुळे पाकिस्तानी वस्तूंची घुसखोरी रोखण्यास आणखी बळ मिळणार आहे’, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिल्याचे वृत्त TOI ने दिले.
काय बदलले आहे?
परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) 2 मे रोजी एक अधिसूचना जारी केली आहे ज्याद्वारे परराष्ट्र व्यापार धोरण (FTP) 2023 मध्ये एक नवीन तरतूद जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये पाकिस्तानमधून आयात पूर्णपणे थांबवण्यात आल्याचे म्हटले आहे. या तरतुदीत ‘पुढील आदेशापर्यंत पाकिस्तानमध्ये तयार होणाऱ्या किंवा निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात किंवा वाहतूक तात्काळ थांबवण्यात यावी’ असे म्हटले आहे.
‘राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरण’ या संदर्भात असलेल्या चिंतांमुळे हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत यावर अधिसूचनेत भर देण्यात आला आहे.
या निर्बंधातून कोणत्याही सूट मिळण्यासाठी हिंदुस्थानी सरकारची स्पष्ट मान्यता आवश्यक असेल.