महामंडळाच्या तांदळाचा गुजरातमध्ये काळाबाजार; चार सदस्यीय समितीकडून चौकशी सुरू

आदिवासी विकास महामंडळाच्या गोदामातील भाताच्या गुजरातमधील काळाबाजारप्रकरणी सोमवारपासून चार सदस्यीय समितीकडून प्रत्यक्ष चौकशी सुरू करण्यात आली आहे. पंत्राटदारासह भ्रष्ट अधिकाऱयांनी बचावासाठी आटापिटा सुरू केला आहे.

महामंडळाच्या सुरगाणा येथील गोदामातून भात पंत्राटदाराने नाशिकऐवजी गुजरातला नेला. तेथे चढय़ा भावाने विक्री करून काळाबाजार केल्याचे चव्हाटय़ावर आले. यात महामंडळातील व पुरवठा खात्यातील भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱयांचा सहभाग आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी चौकशीसाठी समिती नियुक्त केली आहे. समिती अध्यक्ष प्रादेशिक व्यवस्थापक योगेश पाटील, सहाय्यक व्यवस्थापक प्रशांत खामकर, अकाQटंट सुधीर पाटील आणि एक खासगी ऑडिटर यांनी सोमवारपासून या अपहाराची प्रत्यक्ष चौकशी सुरू केली.

गोदामाची जबाबदारी असणारे प्रादेशिक व्यवस्थापक रोहित बनसोडे, संबंधित अन्य अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून एकूण जमा भात, पंत्राटदाराला मिलवर देण्यासाठी पाठविलेला साठा याची संपूर्ण माहिती कागदपत्रांसह घेण्यात आली. काही प्रश्नांची सरबत्ती करून खुलासा मागण्यात आला. भाताचे ट्रक मिलमध्ये गेल्याच्या पुराव्यांचीही मागणी करण्यात आली. हे पुरावे सुरगाणा ते नाशिक या प्रवासातील सीसीटीव्ही पुराव्यांशी जोडून पडताळणी केली जाणार आहे. यामुळे संबंधित भ्रष्ट टोळीचे धाबे दणाणले आहे.