
गोपाळ पवार, मुरबाड
बारवी धरण ठाणे जिल्ह्यासाठी वरदान ठरले आहे. शहरी भागातील पिण्याच्या पाण्याची चिंता या धरणामुळे कायमची मिटली. शिवाय उद्योगांनाही मुबलक प्रमाणात बारवीतून पाणीपुरवठा होतो. असे असले तरी बारवी धरणाच्या कुशीतील पाच गावे आणि सात पाडे आजही तहानलेलीच आहेत. बारवी बुडित क्षेत्रातील काचकोली, कान्होळ, कोले, वरखड, मोहघर ही गावे आणि जांभूळवाडी, मारधवाडी, बुरुडवाडी, देवपाडा, देवराळवाडी, सुकाळवाडी, तळेवाडी या पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. 1971 पासून आजपावेतो या एकाही गावपाड्यात नळयोजना राबवलेली नाही. परिणामी उन्हाळ्यात तळपत्या उन्हात पायपीट करत महिलांना पाण्यासाठी रानोमाळ हिंडावे लागत आहे.
‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी अवस्था बारवी प्रकल्पग्रस्तांची झाली आहे. 1971 पासून 54 वर्षे उलटली तरी आजही अनेक गावांचे पुनर्वसन झालेले नाही. योग्य पुनर्वसन होईल या आशेवर शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या. मात्र आज याच भूमिपुत्रांना पुनर्वसनासाठी झगडावे लागत आहे. गाव, जमीन सोडून कित्येक जण देशोधडीला लागले. पुनर्वसन झालेल्या गावांची अवस्था तर केविलवाणी आहे. पाणी, रस्ते, आरोग्याच्या सुविधा, शाळा या मूलभूत सुविधाही क्याच गावांना मिळालेल्या नाहीत. नोकरीसाठी तर सरकारी कार्यालयांची उंबरठे प्रकल्पग्रस्तांना झिजवावे लागत आहेत.
पाण्यासाठी डिसेंबर ते मे महिन्यापर्यंत टँकरवरच अवलंबून राहावे लागते. बोअरवेल, विहिरी, डबक्यातून पाणी आणावे लागते. महिलांचा अर्धा दिवस तर पाणी आणण्यातूनच जातो.
काचकोली, कान्होळ, कोले, वरखड, मोहघर गावठाण ही गावे आणि जांभूळवाडी, मारधवाडी, बुरुडवाडी, देवपाडा, देवराळवाडी, सुकाळवाडी, तळेवाडी या गावपाड्यांना सहा महिने पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढावा यासाठी बारवी प्रकल्पपीडित सेवा संघाने शंभर वेळा आंदोलन करूनही सरकारने न्याय दिला नसल्याची खंत संघटनेचे अध्यक्ष कमलाकर भोईर यांनी व्यक्त केली.
टँकरवरच मदार
बुडित क्षेत्रातील मोहघर या गावाचे 1972 ते 2016 असे दोन वेळा पुनर्वसन झाले. मोहघर गावठाण 1 व 2 मधील 115 घरे असून 1100 लोकवस्ती आहे. मात्र या ठिकाणी पाण्याची कोणतीच व्यवस्था नाही. टँकरच्या पाण्यावरच नागरिकांना तहान भागवावी लागते. दोनदा पुनर्वसन होऊनही या गावात पाण्याची सुविधा देण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे.
पशुधन धोक्यात
बारवी धरण क्षेत्रातील गावांमध्ये शेती आणि दुग्धव्यवसाय हेच रोजगाराचे साधन आहे. मात्र पाणीच नसल्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. जनावरांना चाराही मिळणे मुश्कील झाले आहे. एकेकाळी 12 गावपाड्यांत पाच हजार पशुधन होते. मात्र आता 100 गाई-म्हशीही नसल्याची माहिती शेतकरी दीपक भोईर यांनी दिली.