हिंदुस्थान-पाकिस्तान तणाव, मॉकड्रीलच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत गृहसचिवांची महत्त्वाची बैठक

केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी आज मॉकड्रिल संदर्भात दिल्लीत बैठक घेतली. या बैठकीला वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत गृह मंत्रालयातील सर्वोच्च अधिकाऱ्यांनी मॉक ड्रिलची तयारी आणि सशक्तीकरणाचा आढावा घेतला.

गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना नवीन धोके ओळखून त्यांना सामोरे जाण्यासाठी मॉक ड्रिल्स घेण्याचे निर्देश दिले आहेत. गृह मंत्रालयाच्या पत्रकानुसार, या मॉक ड्रिल दरम्यान घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन, मॉक ड्रिलच्या बाबतीत नागरिकांना स्वरक्षणाचे धड्यांचा समावेश आहे.

मॉक ड्रिल्सच्या अंतर्गत, राज्ये विविध यंत्रणांची आपत्कालीन प्रतिसादाची क्षमता तपासली जातील. यामध्ये ब्लॅकआउट, आपत्कालीन व्यवस्था, महत्त्वाच्या कारखान्यांचे आणि सुविधा केंद्रांचे कॅमोफ्लाजिंग आणि योग्य ठिकाणी कसे लपले जावे यांचाही सराव केला जाईल.

महासंचालनालय अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृह रक्षकांनी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवले आहे. त्या पत्रानुसार, सध्याच्या जागतिक राजकीय परिस्थिती लक्षात घेता नागरी संरक्षणाची तयारी ठेवणे योग्य आहे असे म्हटले आहे. तसेच 7 मे रोजी देशातील 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे.