
सरकारी सेवेत असताना मृत्यू झालेल्या मुलाची पेन्शन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आजी-आजोबांना देण्याचे महत्त्वपूर्ण आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
अकोला येथील या 75 वर्षीय आजी-आजोबांचा मुलगा एका शाळेत 1999 पासून कामाला होता. शाळा परिसरात सर्पदंशाने त्याचा 2008 मध्ये मृत्यू झाला. त्याची पेन्शन मिळावी यासाठी आजी-आजोबांनी नाशिकच्या आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे अर्ज केला.
निधन झालेल्या कर्मचाऱयाच्या अशा बायोलॉजिकल पालकांना पेन्शनचा लाभ देता येणार नाही, असे या अधिकाऱयाने कळवले. त्याविरोधात आजी-आजोबांनी न्यायालयाचे दार ठोठावले.
न्या. रवींद्र घुगे व न्या. अश्विन भोबे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. अविवाहित कर्मचाऱयाचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर निर्भर असलेल्यांना पेन्शनचा लाभ द्यावा, असा जीआर राज्य शासनाने 2015 मध्ये काढला आहे. त्या आधारावर या आजी-आजोबांना बायोलॉजिकल पालक म्हणून मुलाच्या पेन्शनचा लाभ द्यावा, असे आदेश खंडपीठाने प्रशासनाला दिले.
‘त्या’ पालकांना लाभ मिळायला हवा
अविवाहित कर्मचाऱयावर निर्भर असलेल्या पालकांना कुटुंब पेन्शनचा लाभ देणारा जीआर 2015 मध्ये राज्य शासनाने जारी केला. हा जीआर पूर्वलक्षी प्रभावाने लागू होत नाही. याचिकाकर्त्यांच्या मुलाचा मृत्यू 2008 मध्ये झाला आहे. त्यांना याचा लाभ मिळणार नाही, असा युक्तिवाद राज्य शासनाने केला. असे असले तरी संबंधित जीआर जारी झाला त्या वर्षी हयात असलेल्या पालकांना त्याचा लाभ मिळायला हवा, असे खंडपीठाने स्पष्ट केले.