
हनुमानाने जे अशोकवाटिकेत केले तेच आम्ही केले असे उदाहरण देत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हिंदुस्थानी संरक्षण दलांच्या कारवाईचे कौतुक केले. हिंदुस्थानी लष्कराने अचूकता, सतर्कता आणि संवेदनशीलता दाखवून कारवाई केले. जे लक्ष्य ठरवले गेले त्यावर अचूक हल्ला केला. दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले असे राजनाथ सिंह म्हणाले.
कोणत्याही सामान्य नागरिकाचा जीव जाऊ नये याची काळजी लष्कराने घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली लष्कराने केलेल्या कारवाईमुळे संपूर्ण हिंदुस्थानींची मान अभिमानाने उंचावली आहे, असे ते म्हणाले. आम्ही हनुमानाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याचे पालन केले. त्यांनी ज्याप्रकारे अशोक वाटिका उद्ध्वस्त केली होती त्याप्रमाणेच ज्यांनी आम्हाला मारले त्यांनाच आम्ही मारले असे राजनाथ सिंह म्हणाले. आपल्या भूमीवर हल्ला झाल्यानंतर त्याचे प्रत्युत्तर देणे हा आमचा अधिकार आहे. आम्ही केलेली कारवाई अतिशय विचारपूर्वक केलेली आहे. दहशतवाद्यांचे खच्चीकरण करण्यासाठी ही कारवाई होती. केवळ त्यांच्या इमारती आणि तळांना लक्ष्य करण्यापुरती ही कारवाई मर्यादित ठेवली गेली. मी आपल्या सैन्याच्या शौर्याला सलाम करतो, असेही राजनाथ सिंह म्हणाले.