Operation Sindoor Update – ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; सर्वपक्षीय बैठकीनंतर हिंदुस्थानची गर्जना

‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर दिल्लीमध्ये गुरुवारी सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या हल्ल्याची माहिती दिली. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’ अजून संपलेले नाही. पाकिस्तानविरुद्ध हे ऑपरेशन सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनीही सर्वपक्षीय बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली.

सर्वपक्षीय बैठकीनंतर किरण रिजिजू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्व नेत्यांनी त्यांचे विचारही मांडले. बैठखीत संरक्षणमंत्र्यांनी सर्व नेत्यांना ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली. तसेच सद्य परिस्थितीही सांगितली. यावर सर्वांनी आपले मत व्यक्त करत सूचनाही दिल्या.

सर्व नेत्यांनी हिंदुस्थानी लष्कराचे अभिनंदन केले. सरकार आणि हिंदुस्थानी सैन्याच्या प्रत्येक कृतीलाही पाठिंबा दिला, असेही किरण रिजिजू यांनी सांगितले. तसेच ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. ते सुरुच राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.