शस्त्रसंधीमुळे आश्चर्य, अशी संधी पुन्हा नाही; माजी लष्करप्रमुख, संरक्षणतज्ञांनी मांडली मते

शस्त्रसंधीमुळे आश्चर्य वाटले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला हिंदुस्थानने चोख प्रत्युत्तर दिले. परंतु, यातून काय साध्य झाले. शस्त्रसंधीमुळे आश्चर्य वाटले. कारण दहशतवाद मुळासकट उखडून टाकण्याची आणि पाकिस्तानला चांगला धडा शिकवण्याची अशी संधी पुन्हा मिळणार नाही, अशी मते माजी लष्करप्रमुख आणि तज्ञांनी मांडली आहेत.

दहशतवाद्यांविरोधात हिंदुस्थानने लष्करी कारवाई केली, परंतु यातून काहीच राजकीय किंवा रणनीतीच्या दृष्टीने लाभ झाला नाही. या सगळ्यात आपण नेमके काय साध्य केले हा प्रश्न आता आपण भविष्यावर सोडला आहे, अशी प्रतिक्रिया माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. पी. मलिक यांनी ‘एक्स’वरून व्यक्त केली. तर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी होण्याची ही पहिली वेळ नाही. समुद्र, जमीन आणि आकाशातून लष्करी कारवाई करण्यात आली. त्यातून जे काही समोर आले ते स्वागतार्ह आहे. परंतु याप्रकरणी पाकिस्तानवर प्रचंड दबाव आणून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज होती. पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई करण्याची आपल्याला तिसऱयांदा संधी मिळाली. अशी संधी भविष्यात पुन्हा मिळण्याची शक्यता फार कमी आहे, असे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी म्हटले आहे.

इंदिरा गांधी बनणे सोपे नाही -व्ही. के. सिंग

इंदिरा गांधी बनणे सोपे नाही असे काँग्रेसने म्हटले आहे. तर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाते यांची ‘एक्स’ पोस्ट माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी शेअर केली आहे. पंतप्रधान असताना इंदिरा गांधी यांनी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना म्हटले होते माझा पाठीचा कणा सरळ आहे. आमच्याकडे इच्छाशक्ती आणि शस्त्र आहेत. ती वेळ आता गेली. जेव्हा एखादा देश तीन ते चार हजार मैल दूरवर बसून आदेश देईल की हिंदुस्थान त्यांच्या मर्जीने चालेल, ही हिम्मत होती. असे पोस्टमध्ये म्हटले आहे.   

ही तर आपली जुनी राजकीय परंपरा -चेलानी

जेव्हा आपला विजय होणार असतो तेव्हा त्याचे रूपांतर पराभवात करण्याची आपली जुनी राजकीय परंपरा आहे, अशा शब्दांत राजकीय विश्लेषक आणि लेखक ब्रह्मा चेलानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 2020 मध्ये चीनने लडाखमधघ्ये घुसखोरी केली. तेव्हा हिंदुस्थानला पैलास पर्वतावरील आपला ताबा सोडावा लागला. लडाखमध्ये चीनने बफर झोन तयार केले होते. त्याला हिंदुस्थानने मान्यता दिली. आताही हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले, पण पाचव्या दिवशी ते थांबवावे लागले, असेही चेलानी यांनी म्हटले आहे.