
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत बाकावरच बसावे लागणार असल्याचे कळताच हिंदुस्थानच्या महान फिरकीवीर रविचंद्रन अश्विनने मालिकेदरम्यानच आपल्या देदीप्यमान कसोटी कारकीर्दीचा शेवट केला होता. आता त्याच मालिकेतील कामगिरीने रोहित शर्मा आणि विराट कोहली युगाचाही शेवट केला आहे. म्हणजेच बॉर्डर-गावसकर करंडकात हिंदुस्थानच्या तीन महान आणि दिग्गज खेळाडूंच्या विकेट पडल्या आहेत. त्यामुळे आता हिंदुस्थानी संघाला आता आपल्या नव्या दमाच्या खेळाडूंच्या दमदार कामगिरीच्या जोरावर पुन्हा उभारी घ्यावी लागणार आहे.
एकाच मालिकेत तीन विकेट पडल्यामुळे हिंदुस्थानने आपला सर्वात यशस्वी आणि महान गोलंदाज गमावला आणि आता सर्वात यशस्वी कर्णधार आणि फलंदाज. अश्विन, रोहित आणि विराटच्या निवृत्तीमुळे हिंदुस्थानच्या कसोटी संघात एक प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 12-13 वर्षांपूर्वीही हिंदुस्थानी संघावर अशीच स्थिती आली होती. तेव्हाही राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर या दिग्गजांनी वर्षभरात निवृत्ती घेतली होती. त्यानंतर विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे या खेळाडूंनी हिंदुस्थानची फलंदाजी सावरली होती. आता तीच वेळ शुभमन गिल, यशस्वी जैसवाल, ऋषभ पंत या नव्या दमाच्या फलंदाजांवर आलीय.
आता उरला फक्त जाडेजा
अश्विन, रोहित आणि कोहली यांच्या निवृत्तीनंतर आता फक्त रवींद्र जाडेजा हा एकमेव सीनियर खेळाडू टीम इंडियात उरला आहे. त्याचीही कारकीर्द दोन तपाहून अधिक झालीय. एक-दोन वर्षांत जाडेजा जर कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला नाही तर त्यालाही चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणेसारखे संघाबाहेर करण्यात येण्याची शक्यता आहे. ईशांत शर्मा, उमेश यादव व ऋद्धिमान साहा या खेळाडूंनाही असे निवृत्ती घेण्यापूर्वीच संघातून बाहेर करण्यात आले होते. जाडेजानंतर जसप्रीत बुमरा व लोकेश राहुल हे दोघेच टीम इंडियातील अनुभवी खेळाडू आहेत. फिटनेसच्या समस्येमुळे बुमरा किती काळ टीम इंडियात राहील काही सांगता येत नाही. राहुल आणखी 3 ते 4 वर्षे कसोटी क्रिकेट खेळू शकतो.