जिजामाता उद्यानातील मत्स्य प्रकल्पात घोटाळ्याचा संशय; निविदा रद्द करण्याची मागणी

भायखळा येथील जिजामाता उद्यानातील प्रस्तावित मत्स्यालय प्रकल्पाचे कंत्राट मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकाऱयाच्या कंपनीला देण्याचा घाट महायुती सरकारने घातला आहे. मत्स्यालयासाठी या अधिकाऱ्ंयाची एकमेव निविदा आली होती असा आरोप आहे. यामुळे घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त होत असून ही निविदा प्रक्रिया तत्काळ रद्द करून या संपूर्ण प्रक्रियेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. रईस शेख यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. मत्स्यालयासाठी एकमेव निविदा आली आणि तीसुद्धा महापालिका अधिकाऱ्याच्या कंपनीची, हेच संशयास्पद असून या निविदा प्रक्रियेत महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी गुंतले असल्याने हा प्रकारच गंभीर असल्याचे शेख यांनी पत्रात म्हटले आहे. या निविदेत प्रकल्पातील अग्नी प्रतिबंधक सुरक्षा आणि अन्य धोक्यांबाबत काहीच विचार करण्यात आलेला नाही. अन्य कुणाची निविदा येऊ नये म्हणून निविदेत फेरफार केला असावा, असेही शेख यांनी म्हटले आहे.