ड्युटी फर्स्ट…वर्षभराच्या चिमुकल्याला सोडून आई सीमेवर

हिंदुस्थान-पाकिस्तान दरम्यान शस्त्रविराम झाला असला तरी सर्व जवानांना सुट्टय़ा रद्द करून डय़ुटीवर हजर होण्यास सांगण्यात आलंय. अमरावती जिह्यातील बोरगाव पेठमधील बीएसएफच्या महिला जवान रेश्मा इंगळे या सुट्टीवर आलेल्या असताना परत सीमेवर बोलावण्यात आले. एक वर्षाच्या बाळाला सोडून त्या सीमेवर गेल्या आहेत.

चिमुकल्यापासून दूर जाताना त्यांचे मन हेलावले. डय़ुटी फर्स्ट असे म्हणत त्यांनी पाणावल्या डोळ्यांनी लेकाचा निरोप घेतला. त्यांच्या निर्णयाचे त्यांच्या कुटुंबाने आणि अचरपूरच्या लोकांनी कौतुक केले. बीएसएफ महिला जवान रेश्मा इंगळे या 15 दिवसांच्या सुट्टीवर आपल्या गावी आल्या होत्या, पण त्यांना तातडीने डय़ुटीवर हजर व्हायला सांगितले. सुट्टीवर येऊन त्यांना आठ दिवसच झाले होते. मात्र सीमेवरची परिस्थिती बघता आधी देशसेवा मग कुटुंब म्हणत रेश्मा आपल्या या एक वर्षाच्या तान्हुल्याला सोडून बॉर्डरवर रवाना झाल्या. रेश्मा मार्च 2013 मध्ये बीएसएफमध्ये रुजू झाल्या होत्या. सुरुवातीला

पंजाबमध्ये त्यांची ट्रेनिंग झाली. त्यानंतर बांगलादेश बॉर्डरवर त्रिपुरा या ठिकाणी होत्या. तिथून पुढे कच्छच्या पाकिस्तान बॉर्डरवर आणि सध्या त्या पाकिस्तान बॉर्डर पंजाबमध्ये तैनात आहेत.

रेश्मा इंगळे यांचे पती भारत इंगळे गुजरातमध्ये एका बँकेत असिस्टंट मॅनेजर आहेत. आपली नोकरी सोडून ते बाळाला सांभाळायला आले. भारत इंगळे म्हणतात, मला गर्व आहे की, माझी बायको देशाच्या सीमेवर राहून देशाची सुरक्षा करते.

दुःख होतंय पण…

रेश्मा इंगळे म्हणाल्या, आमची आज देशाला गरज आहे. त्यामुळे बाळाला सोडून जाताना खूप दुःख होतंय. आपण देशाच्या कामी येतोय याचा अभिमानदेखील वाटतोय. हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आम्हाला कॉल आले आहेत. तुमची सुट्टी रद्द करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलंय. त्या ठिकाणची परिस्थिती पाहता बाळाला सोबत घेऊन जाणे शक्य नाही, असे रेश्मा म्हणाल्या.