दोन हजार विद्यार्थी शिकतात म्हणून अनधिकृत बांधकाम नियमित करता येणार नाही

शाळेत 2 हजार विद्यार्थी शिकतात म्हणून अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचे आदेश अधिकाऱयांना देता येणार नाहीत. असे स्पष्ट करत हायकोर्टाने शाळेची मागणी फेटाळून लावत बेकायदा बांधकामप्रकरणी पुण्यातील एका शाळेला दिलासा देण्यात नकार दिला.

आर्यन वर्ल्ड स्कूल ही शैक्षणिक संस्था भिलारे वाडी येथे पहिली ते दहावीपर्यंत शाळा चालवत आहे. ही शाळा बेकायदेशीरपणे उभारण्यात आल्याने पीएमआरडीएने 17 एप्रिल रोजी अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. त्याला शाळेने अॅड. नीता कर्णिक यांच्यामार्फत आव्हान दिले. या याचिकेवर न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

ग्रामपंचायत, सरपंचांवर कारवाई करा

केवळ 2000 विद्यार्थ्यांना शिकवणारी शैक्षणिक संस्था असल्याने बेकायदेशीर बांधकाम नियमित करण्याचे पीएमआरडीएला निर्देश द्यावेत, हा याचिकाकर्त्याचा युक्तिवाद मान्य करता येणार नाही असे खंडपीठाने स्पष्ट करत शाळेची मागणी फेटाळून लावली. इतकेच नव्हे तर, अशा प्रकारे ना हरकत प्रमाणपत्र अथवा परवानगी देणाऱया ग्रामपंचायत, सरपंचांवर कारवाई करण्याचे आदेश देत 14 नोव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले.