
महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई बुधवारी (14 मे 2025 रोजी) देशाचे 52 वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली. निवृत्त सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती गवई यांची मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भूषण गवई हे प्रसिद्ध राजकारणी, प्रख्यात आंबेडकरवादी, माजी खासदार आणि अनेक राज्यांचे राज्यपाल राहिलेले आर.एस. गवई यांचे पुत्र आहेत.
याआधी 49 वे सरन्यायाधीश राहिलेले उदय ललित हे महाराष्ट्राचे होते. त्यामुळे देशाच्या सर्वोच्च न्यायिक अध्यक्षपदी नियुक्ती होणारे गवई हे महाराष्ट्राचे दुसरे सुपूत्र असणार आहेत. 13 मे या दिवशी संजीव खन्ना निवृत्त झाले आहेत. कायदा मंत्रालयाने न्यायमूर्ती खन्ना यांना त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड करण्याची औपचारिक विनंती केली होती. त्यानुसार विद्यमान सरन्यायाधीशांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून सर्वात वरिष्ठ न्यायाधीश म्हणून गवई यांची शिफारस केली होती. त्यामुळे न्यायमूर्ती गवई हे आता देशाचे 52वे सरन्यायाधीश झालेले आहेत. दरम्यान, न्यायमूर्ती गवई नोव्हेंबर 2025 मध्ये निवृत्त होणार असल्याने ते केवळ सहा महिनेच देशाचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील. गवई यांची 24 मे 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती.
न्यायमूर्ती गवई हे मुळचे अमारवतीकर असून, त्यांनी ऑगस्ट 1992 ते जुलै 1993 या काळात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात Assistant Government Pleader आणि Additional Public Prosecutor या पदावर काम केलेले आहे. तसेच 17 जानेवारी 2000 पासून त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले होते.
भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना अनेक ऐतिहासिक निकालांच्या खंडपीठात त्यांचा समावेश होता. तसेच 500 आणि 1000 रुपयांच्या चलनी नोटा सरकारने रद्दबातल केल्या होत्या. सरकारचा हा निर्णय कायम ठेवण्याचा निर्णय देणाऱ्या खंडपीठातही त्यांचाच समावेश होता.