हिंदुस्थानवर हल्ले करण्यास तुर्कीने पाकिस्तानला केली मदत, 350+ ड्रोनसह प्रशिक्षित जवानही धाडले!

हिंदुस्थानवर हल्ले करण्यासाठी तुर्कीने पाकिस्तानला केवळ ड्रोनची मदत केली असे नाही, तर ड्रोन हल्ल्यांमध्ये मदत करण्यासाठी इस्लामाबादला लष्करी प्रशिक्षित जवान पाठवले असल्याची माहिती आता समोर येत आहे. इंग्रजी वृत्तवाहिनी ‘इंडिया टुडे टीव्ही’ने ही बातमी सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केली आहे.

ऑपरेशन सिंदूरमध्ये (Opearation Sindoor) दोन तुर्की लष्करी जवानही मारले गेले. हिंदुस्थानसोबतच्या पाकिस्तानच्या चार दिवसांच्या युद्धजन्य परिस्थितीत इस्तंबूलने इस्लामाबादला 350 हून अधिक ड्रोन पुरवले होते, असे सूत्रांनी सांगितले. ‘ही माहिती पाकिस्तान उघड करणार नाही’, असेही सूत्रांनी सांगितले.

सूत्रांच्या मते, ऑपरेशन सिंदूरनंतर तुर्की सल्लागारांनी पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांना हिंदुस्थानवर ड्रोन हल्ल्यांसाठी मदत केली.

पाकिस्तानने हिंदुस्थानविरुद्ध Bayraktar TB2 आणि YIHA ड्रोनचा वापर केल्याचे वृत्त आहे. हे ड्रोन लक्ष्य निश्चित करण्यासाठी आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांसाठी वापरले जातात.

अलिकडच्या वर्षात पाकिस्तान-तुर्कीचे धोरणात्मक संबंध प्रचंड वाढले आहेत. विशेषत: लष्कारी मदतीची बाब चिंताजनक आहे. तुर्की सरकारने केवळ हल्ल्यासाठीचे साहित्य पुरवले नाही तर पाकिस्तानच्या सैन्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी पाठवून त्यांना प्रशिक्षण देखील दिले आहे.

7 आणि 8 मे च्या मध्यरात्री, पाकिस्तानी सैन्याने उत्तर आणि पश्चिम सीमेवरील हिंदुस्थानी लष्करी तळ, नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्यासाठी सुमारे 300-400 ड्रोनचा वापर केला.

‘ड्रोनच्या अवशेषांची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. सुरुवातीच्या अहवालांवरून असे दिसून येते की ते तुर्की असिसगार्ड सोंगर ड्रोन आहेत’, असे कर्नल सोफिया कुरेशी यांनी ऑपरेशन सिंदूरवरील पत्रकार परिषदेत सांगितले होते.

‘हिंदुस्थानी सैन्याने यापैकी अनेक ड्रोन कायनेटिक आणि नॉन-कायनेटिक माध्यमांचा वापर करून पाडले. इतक्या मोठ्या प्रमाणात हवाई घुसखोरीचा संभाव्य उद्देश हवाई संरक्षण प्रणालींना लक्ष्य करणे आणि गुप्त माहिती गोळा करणे असावा’, अशी प्राथमिक माहिती कर्नल कुरेशी यांनी दिली होती.

हिंदुस्थानने तुर्की ब्रॉडकास्टरचे एक्स अकाउंट केले ब्लॉक

दिल्लीशी अलिकडेच झालेल्या चार दिवसांच्या संघर्षात इस्लामाबादला इस्तंबूलने लष्करी पाठिंबा दिल्याबद्दल हिंदुस्थानने बुधवारी एक्सवर तुर्कीचे न्यूज अकाउंट ब्लॉक केले आहे.