टीम इंडियाचे नुकसान होणार, विराट-रोहितच्या निर्णयावर योगराज सिंगसुद्धा नाराज

विराटच्या निवृत्तीमुळे हिंदुस्थान संघाचे खूप मोठे नुकसान होणार. तो खूप मोठा खेळाडू आहे. त्याचा प्रभाव संघावर कायम होता. विराटप्रमाणे रोहितमध्ये अजूनही काही वर्षे खेळण्याचे क्रिकेट बाकी होते. 2011 मध्ये जसा हिंदुस्थानी संघात परिवर्तनाचा काळ सुरू झाला होता तसाच आताही सुरू झाला आहे. तेव्हा अनेक खेळाडूंना संघातून वगळण्यात आले. काहींना निवृत्ती घेण्यास भाग पाडले तर काहींना निवृत्ती दिली. तेव्हाही टीम इंडियाची घडी विस्कटली होती. आताही संघाची घडी विस्कटली गेली असल्याची भावना माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी मांडली.

योगराज यांच्या मतानुसार विराटकडे आता करण्यासारखं आणि मिळवण्यासारखं काही उरलं नव्हतं. म्हणूनच त्याने आपल्या आत्मिय संतुष्टीसाठी हा निर्णय घेतला असावा. विराट, रोहितसारख्या महान खेळाडूंनी वयाच्या पन्नाशीपर्यंत क्रिकेट खेळायला हवे. मी त्यांच्या निवृत्तीच्या निर्णयाने खूप दुःखी झालोय. आता त्यांच्या निवृत्तीमुळे युवा पिढीला प्रेरणा देणारा आता कुणीही खेळाडू हिंदुस्थानी संघात शिल्लक राहिला नसल्याचेही योगराज यांनी सांगितले.