
तब्बल अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल रविवारपासून वाहतुकीसाठी खुला झाला. त्यामुळे अंधेरी पूर्व व पश्चिमेसह पश्चिम उपनगरातील वाहतूककाेंडी फुटणार आहे. गोखले पूल वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर या पुलावरून लवकरच बेस्ट बसेसही सुरू केल्या जाणार आहेत. त्यामुळे अंधेरी, जोगेश्वरी, वांद्रे येथील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, या पुलावर प्रवासी वाहतूक आणि बेस्ट बस सुरू झाल्यानंतर मेट्रोवर पडलेला अतिरिक्त प्रवाशांचा ताणही कमी होणार आहे.
अंधेरीत 3 जुलै 2018 रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या पुलाचे मुंबई आयआयटीकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यात हा पूल वाहतुकीला धोकादायक असल्याचा अहवाल मुंबई आयआयटीने महापालिकेला दिला. त्यामुळे हा पूल 7 नोव्हेंबर 2022 रोजी वाहतुकीला पूर्णपणे बंद करण्यात आला. त्यानंतर मुंबई महापालिका आणि रेल्वेने संयुक्तरीत्या या पुलाची उभारणी सुरू केली. पूल उभारण्यासाठी सुमारे 160 कोटींहून अधिक खर्च आला आहे.