
शासकीय जमीन हडप करून परस्पर विकणारे मिंधे आमदार थोरवे यांच्या पंटरांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी त्यांना अद्याप अटक झालेली नाही. हा घपला उघडकीस आल्यानंतर न्हावा शेवा पोलिसांनी मिंधे गटाचा पदाधिकारी आणि पंचायत समितीचा माजी सभापती अमर मिसाळ, राजेश नावीक, अजित भंडारी या तीन पंटरांच्या विरोधात सप्टेंबर 2024 मध्ये गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून हे तिन्ही आरोपी मोकाट फिरत असल्याने न्हावा-शेवा पोलिसांचा तपास संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
सत्ताधारी मिंधे गटाच्या पंटरांनी संगनमताने विंधणे येथील सरकारी जमिनीचे मालक असल्याचे भासवून या जमिनीच्या नोंदी सातबारावर करून घेतल्या. त्यानंतर शासनाच्या मालकीची हीच जमीन संगनमताने शासनाच्या अलिबाग – विरार कॉरिडॉर प्रकल्पासाठी विकून शासनालाच एक कोटी 36 लाख 63 हजार 700 रुपयांना विकून चुना लावला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी मंडळ अधिकारी मनीष जोशी यांच्यामार्फत न्हावाशेवा बंदर पोलीस ठाण्यात फसवणुकीप्रकरणी सप्टेंबर 2024 मध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दहा आरोपींवर गुन्हा दाखल केला. सात महिन्यांत याप्रकरणी दहापैकी आरोपी बेनी ब्रायन डिसोझा (बनावट गेलाराम भुरोममल), संकेत पाटील, संतोष मराठे, बोगस गेलाराम भुरोममल, दत्ता कमदुकर, संतोष पांडे यांना टप्प्याटप्प्याने तर नबीजात अन्सारी याला अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या कटाचे मुख्य सूत्रधार आणि मिंधे आमदार महेंद्र थोरवे यांचे पंटर पंचायत समितीचा माजी सभापती अमर मिसाळ, राजेश नावीक, अजित भंडारी हे तिघे मात्र पोलिसांना अद्याप सापडले नाहीत. हे तिन्ही आरोपी गेले सात महिने मोकाट असल्याने पोलिसांच्या तपासाबाबत सर्वत्र संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांवर प्रचंड दवाब
उरणमध्ये घडलेल्या या जमीन घोटाळ्यात मिंधे गटाचे पदाधिकारी अडकले आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी मिंधे गटाकडून पोलिसांवर प्रचंड दबाव आणला जात आहे. त्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतरही हे आरोपी सात महिन्यांपासून उजळ माथ्याने फिरत आहेत. मिंधे गटाचे आका आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या दबावामुळेच पोलिसांचे हात अद्यापही या तीन आरोपींपर्यंत पोहोचू शकले नाहीत, अशी चर्चा आता रायगड जिल्ह्यात सुरू झाली आहे.
अधिकाऱ्यांची सारवासारव
पोलीस कोणाच्याही दबावाखाली नाहीत. यापैकी काही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र पोलीस तीनही आरोपींच्या मागावर आहेत. त्यांच्याही लवकरच मुसक्या आवळल्या जातील. पोलीस कोणालाही पाठीशी घालत नाहीत, अशी सारवासारव न्हावाशेवा बंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ओवे यांनी केली आहे.