
मराठी ही महाराष्ट्राची ही राजभाषा आहे. पण हीच राजभाषा शिकताना मुलांना अडचण येत आहे. दहावीत मराठी विषयात पास होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात घटले आहे. आणि दुसरीकडे इंग्रजीत पास होण्याचे प्रमाण वाढले आहे. फक्त मराठीच नाही तर हिंदी शिकतानाही मुलांना अडचण येतेय.
टाईम्स ऑफ इंडियाने याबाबात वृत्त दिले आहे. 2022 साली दहावीच्या परीक्षेत 97 टक्के विद्यार्थी मराठी विषयात पास झाले होते. यंदा यात घट होऊन 94 टक्के विद्यार्थी मराठीत पास झाले आहे. हिंदीत 2022 साली पास होण्याचे प्रमाण 97 टक्के इतकं होतं. आता 2025 साली ते प्रमाण कमी होईन 94.1 टक्क्यांवर आलं आहे. दुसरीकड इंग्रजीत पास होण्याचे प्रमाण हे 98 टक्क्यांपर्यंत आहे. गणित आणि विज्ञान विषयातही पास होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पण या विषयात पास होण्याचे प्रमाण हे 95 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
हल्लीची मुलं वाचतच नाही त्यामुळे त्यांच मराठी आणि हिंदी चांगलं होत नाही असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दुसरीकडे मुलं मोबाईलमध्ये गुंग असतात. मोबाईलवरून अॅप्सचा वापर असेल किंवा मेसेज करणे असेल यामध्ये इंग्रजीचा वापर होतो. त्यामुळे मुलांचं इंग्रजी चांगलं होतं असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. तसेच पालकही मुलांचं इंग्रजी चांगलं व्हावं म्हणून अधिक प्रयत्न करताना दिसतात.
राज्यात जे मराठी विद्यार्थ्यांना शिकवलं जातं ते हिंदी आणि इंग्रजीपेक्षा कठीण असतं असं काही तज्ज्ञांनी म्हटलं आहे. तसेच आता पत्र लेखन ही गोष्ट कालबाह्य झालेली आहे, तरी मुलांना ते शिकवलं जातं आणि परीक्षेत तो प्रश्नही असतो.
यात शिक्षकांचही दोष असल्याचे काही तज्ज्ञांनी म्हटलं आहे. राज्यात शिक्षक होण्यासाठी कमीत कमी बारावी आणि दोन वर्षांचे डी एड असणे आवश्यक आहे. पण सातवीच्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान शिकवण्यासाठी एवढी पात्रता कमी आहे असे तज्ज्ञांनी म्हटलं आहे. एखादा कला विभागातून पास झालेला शिक्षक जर दुसरीच्या मुलांना गणित शिकवत असेलत तर मुलांना त्या विषयात रुची निर्माण होईलच असे नाही, मुलांना शिकवण्यासाठी त्या विषयातले तज्ज्ञ हवेत असेही शिक्षणतज्ज्ञांनी म्हटले आहे.