डोनाल्ड ट्रम्प हे भाजपचं कुलदैवत, त्यांनी गावोगावी ट्रम्पच्या यात्रा काढाव्यात; संजय राऊत यांचा घणाघात

मिंधेंनी टेंभी नाक्यावर ट्रम्पचा पुतळा उभारावा आणि अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन साजरा करावा अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच डोनाल्ड ट्रम्प हे भाजपचे कुलदैवत, त्यांनी गावोगावी ट्रम्पच्या यात्रा काढाव्यात असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषद संजय राऊत म्हणाले की, संपूर्ण देश सोफिया कुरेशी यांना मानवंदना देत आहे. एक लढवय्या महिला आपल्या हवाई दलात आहे, त्या हिंदुस्थानचं नेतृत्व करत आहेत. कुरेशी यांच्याविरोधात विधान करणाऱ्या भाजप नेता विजय शहाला ताबडतोब बरखास्त केलं पाहिजे. गुन्हा दाखल करून अटक झाली पाहिजे. इतकंच नाही तर त्याची पक्षातूनच हकालपट्टी झाली पाहिजे. पण भाजप त्याची हकालपट्टी करणार नाही. विजय शहाला लाथ मारून हाकलून दिले पाहिजे असे संजय राऊत म्हणाले.

भाजपने तिरंगा यात्रा काढली आहे. ही यात्रा काढण्याचे कारण काय. हिंदुस्थान पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी झाली आहे. शस्त्रसंधी म्हणजे युद्धविराम. हा युद्धविराम विजय मानून एक पक्ष देशामध्ये विजय सोहळा साजरा करत आहेत. शस्त्रसंधी हा विजय कसा काय असू शकतो? हा युद्धविराम मित्र ट्रम्पच्या हस्तक्षेपाने झाला आहे. यांची काय डोकी फिरली आहेत का? ऐनवेळी माघार घेतल्यामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. यांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे. तिरंगा नव्हे तर अमेरिकेचा झेंडा हाती घेऊन दिल्लीच्या अमेरिकन राजदुतापासून ते व्हाईट हाऊस पर्यंत त्यांनी ही यात्रा काढावी. यांनी गावागावात डोनाल्ड यात्रा भरवावी. त्यांनी सांगावं आमचं कुलदैवत डोनाल्ड ट्रम्प आहेत.
ट्रम्प काल सौदी अरेबियात आले आणि तिथेही त्यांनी सांगितलं की हिंदुस्थान पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी मी घडवली. पण यावर पंतप्रधान मोदींनी उत्तर नाही दिलं. डोनाल्ड ट्रम्प हिंदुस्थानच्या पंतप्रधानांचे रोज कपडे काढतो आहे. आणि तुम्ही अजून डोनाल्ड ट्रम्पंच नाव घेऊन उत्तर द्यायला तयार नाही. डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलत आहेत हे सांगण्याची हिंम्म जर तुमच्यात नसेल तर तुम्ही देशाच्या पंतप्रधानपदी राहू नका. मोदी आणि शहांनी देशावर मेहरबानी करावी असे संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनीही डोनाल्ड यात्रा काढावी. युद्ध, युद्धबंदी आणि शस्त्रसंधी यांच्यातला नेमका अर्थ त्यांना कळतो का? पक्ष फोडणे, आमदार, खासदार विकत घेण्याइतपत सोपा आहे का? आमदार खासदार विकत घेऊन सरकार बनवणं आणि निवडणूक आयोगाला हाताशी धरून पक्ष ताब्यात घेण्या इतक सोपं नाहीये. शस्त्रसंधीला तुम्ही विजय मानता ही तुमची अक्कल. डोनाल्ड ट्र्म्पने तुमचा युद्धविराम केला, युद्धाच्या मैदानातून तुम्हाला खेचले, मोदींना म्हटले गप्प बसा आणि तुम्ही मोदींचे सैन्यवेशातले फोटो टाकून त्याला सलाम करता लाज वाटत नाही तुम्हाला. तुम्ही आमच्या भारतीय सैन्याचा अवसानघात केला. जे सैन्य लाहोर, कराची रावळपिंडी, इस्लामाबादला धडक मारायला तयारीत होतं, तुम्ही त्यांचे पाय खेचले आणि आता तिरंगा यात्रा काढताय. आता टेंभीनाक्यावर डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा मी येतोय बघायला. अमेरिकेचा झेंडा लावा आणि अमेरिकेचा स्वातंत्र्य दिनाच चार जूनला त्या दिवशी तुम्ही उत्सव साजरा करा, ही तुमची लायकी आहे. विजय कळतो का? 1971 साली आम्ही विजय जल्लोष पाहिला. 1971 साली आम्ही विजय यात्रा काढली आम्ही जिंकलो होतो. 92 हजार पाकिस्तानी सैन्याने हिंदुस्थानसमोर गुढगे टेकले. आम्ही रोमांचित झालो होतो. आता रोमांचित व्हावं असं काय झाल होतं. स्वतंत्र व्हायला बलूचिस्तान तयार होतं. फक्त त्यांना भारताची मदत हवी होती. तुम्ही या तेवढी सुद्धा हिंम्मत दाखवू शकले नाही. डोनाल्ड ट्रम्पला उत्तर द्यायची हिंम्मत तुमच्यात नाही. चीनने 27 गावांची नावं बदलली आहेत. मिस्टर मोदी आणि मिस्टर अमित शहांनी राजीनामा द्यावा, तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल असे संजय राऊत म्हणाले.

अमित शहा लवकरच देशाच्या राजकारणात बाजूला होतील. हा माणूस काय आहे माझ्या पुस्तकातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील. तसेच शरद पवार यांचा पक्ष हा मूळ पक्ष आहे. माननीय उद्धव ठाकरे यांची नेतृत्वाखालची शिवसेना ही मूळ शिवसेना आहे. ते एखाद्या गटात कशा करता जातील? मूळ पक्ष त्यांच्याकडे तात्पुरता तो प्रवाह चालू आहे. हेही दिवस जातील मोदी शहा गेले की खाली काय राहतं यांचं? आणि मोदी शहांना जावंच लागेल. ते का अमृत पिऊन आलेत का? युद्धभूमीवर जाऊन परवा अमृत पिऊन आलेले नाहीत ना? असेही संजय राऊत म्हणाले.