
ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढी भागिदारी या तत्वानुसार राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची आग्रही मागणी केली होती. भाजपाने सातत्याने या मागणीला विरोध केला पण नाईलाजाने भाजपा सरकारने ती मान्य केली. जातनिहाय जनगणनेनंतर सर्वच समाज घटकांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. सरकारने जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून तेलंगणा व कर्नाटक पॅटर्न राबवावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, जातनिहाय जनगणना ही केवळ शिरगणती नाही तर सामाजिक अजेंडा आहे. महाराष्ट्रात ओबीसींची संख्या २७ वरून वाढून ६४ टक्क्यापर्यंत जाऊ शकते. या जनगणनेमुळे प्रत्येक समाज घटकांची लोकसंख्या किती हेही समजेल, पाटीदार, गुर्जर, मराठा आरक्षणाचा प्रश्नही यामुळे सुटण्यास मदत होईल. भाजपा सरकारला जातनिहाय जनगणनेचा निर्णय घ्यावा लागला याचे सर्व श्रेय राहुल गांधी यांना जाते, त्यांनी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला. सरकारने याची प्रक्रिया काय आहे? माहिती कशी जमा करायची? याचे प्रशिक्षण कर्मचारी अधिकारी यांना दिले पाहिजे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
राहुल गांधींचा ताफा अडवणे तानाशाहीचा प्रकार..
लोकसभेतील विरोध पक्षनेते राहुल गांधी बिहारमध्ये ‘पलायन रोको नोकरी दो’ अभियानासाठी जात असताना त्यांचा तोफा पोलिसांनी अडवला यातून सत्तेचा माज दिसतो आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास जाणे हा काय गुन्हा आहे का? पण भाजपा आघाडीचे सरकार लोकशाही मानत नाही. हा सर्व प्रकार तानाशाहीचा असून मुलभूत अधिकारांवर घाला घालणारा आहे. काँग्रेस पक्ष याचा निषेध करत आहे.
भाजपाचा मंत्री विजय शाहवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
कर्नल सोफिया यांच्याबद्दल अत्यंत घाणेरडी भाषा वापरणारा भाजपाचा मध्य प्रदेशातील मंत्री विजय शाह यांना भाजपाने मंत्रीपदावरून व पक्षातून तात्काळ हाकलून दिले पाहिजे पण भाजपाचे केंद्रीय नेतृत्वही त्यांना पाठीशी घालत आहे असे दिसते. मा. हाय कोर्टाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले असताना विजय शाह निर्लज्जपणे सुप्रीम कोर्टात जातात. पण सुप्रिम कोर्टानेही त्यांना फटकारले आहे. हा देशाच्या सन्मानाचा प्रश्न आहे, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
तत्पूर्वी आज सकाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यूनिसेफ प्रकल्पाच्या माजी शिक्षणाधिकारी विजयाताई चव्हाण यांची भेट घेतली. 2002 मध्ये, बुलढाणा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक उपक्रम राबविले. त्या काळात विजयाताईंनी दिलेले मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य आजही स्मरणात आहे. आज मुंबईत त्यांनी खास बोलावून, आत्मीयतेने न्याहारीची व्यवस्था केली, आणि ५००० रुपयांचा पक्षनिधी धनादेशाद्वारे सुपूर्त केला असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.